Talegaon Dabhade: ‘एक मूठ धान्य गोरगरीबांसाठी’ उपक्रमातून दोन हजार कुटुंबांना मिळाला महिनाभराचा शिधा

उद्योजक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  जागतिक महामारी कोरोनाच्या संकटातून देश जात असताना हातावर पोट असणारी असंख्य कुटुंबे उपासमारीने त्रस्त झालेली आहेत. तळेगावमधील अशा भुकेल्या लोकांसाठी ‘एक मूठ धान्य गोरगरीबांसाठी’ या उद्योजक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे येथील 25 मोठी गणेशोत्सव मंडळे आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या. उपक्रमाला या भागातील दानशूर व्यक्तींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 10 टन धान्य जमा झाले. त्यातून तळेगाव स्टेशन परिसरातील सुमारे दोन हजार कुटुंबांना एक महिन्याचे शिधावाटप करण्यात आले.

प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 2 किलो तेल, 2 किलो डाळी, तिखट मसाला, मीठ, साखर, टूथपेस्ट, चहा पावडर, साबण, बिस्किटे, कांदे, बटाटा व भाजी अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मावळचे प्रांताधिकारी व मावळचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

तळेगाव स्टेशन विभागातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ (ट्रस्ट), रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी, सिद्धिविनायक ट्रस्ट व इतर समाजसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्ती यांचे संयुक्त विद्यमाने सुमारे दहा टन धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच वाटप करण्याची सुरुवात मावळचे उपविभागीय अधिकारी संदीप शिर्के यांचे हस्ते करण्यात आली.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, शिक्षण मंडळ समिती सभापती गणेश खांडगे, उद्योजक किशोर आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष शिंदे, रोहित लांघे, निखील भगत, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे, उद्योजक संतोष शेळके, संदीप गराडे, दशरथ जांभूळकर, सुनील पवार, सुनील भोंगाडे व सर्व मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

या जीवनावश्यक वस्तू सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील तयार केलेल्या गरजवंताच्या यादीप्रमाणे प्रत्येकाला घरपोच दिल्या जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असून देशावर आलेल्या संकटाच्या काळात शासनाचे सर्व नियम पाळून पार पाडला जात आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार संदीप शिर्के यांनी काढले.

सरकारी मदत अजून लोकांपर्यंत पोचली नसली तरी किशोर आवारे यांच्यासारख्या दानशूर व्यक्तीमुळे कोणत्याही गरीबाला उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही, असे मधुसूदन बर्गे म्हणाले.

या वेळी गणेश खांडगे, दशरथ जांभूळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. तर योगेश भगत यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.