Talegaon Dabhade : पं. विजय कोपरकर यांच्या सुरांत चिंब झाले तळेगावकर रसिक

एमपीसी न्यूज- सुप्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर यांच्या सुरेल शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाने तळेगावकर रसिक चिंब भिजून गेले. श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने कै. सुनील साने स्मृती संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफिल आयोजित केली होती. या मैफिलीला तळेगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली.

दरवर्षी 26 जानेवारी रोजी तळेगांव येथे श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने कै.सुनील साने स्मृती संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यंदाच्या महोत्सवात सुप्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफिल आयोजित केली होती.

डॉ.मधुसूदन पटवर्धन, डॉ.वसंतराव देशपांडे आणि पं.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्यत्व लाभलेल्या पं. विजय कोपरकर यांनी आपल्या मैफिलीची सुरेल सुरुवात नटभैरव रागातील विलंबित एकतालातील … मान अब मोरी बात …….या बंदिशीने केली आणि तळेगावकर रसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली त्यानंतर द्रुत लयीतील सुजान करिये गुण की चर्चा …. ही बंदिश सादर केली व मैफिलीत रंग भरला. या नंतर मिया की तोडी रागातील अब मोरी नैय्या पार करो…..त्रितालमध्ये, लंगर का करीये…द्रुत तीनताल या बंदिशी आणि एकतालातील तराणा सदर केला. त्यानंतर तेजोनिधी लोहगोल (कट्यार ..) हे नाट्यगीत आणि अवघे गर्जे पंढरपुर…..हे भजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

मध्यंतरानंतर शुध्द सारंग रागातील बेगी तरसावो देवो सजनवा…ही बंदिश त्रितालात सादर केली. नंतर ‘सावरे ऐजय्यो …..ही कुमार गंधर्वांची ठुमरी आणि शत जन्म शोधिताना हे संन्यस्त खड:ग नाटकातले पद सादर करून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि रसिकांची भरभरून दाद मिळवली.
कार्यक्रमाची सांगता ‘धर पिचकारी जा मै तोपे मारो ना मारू….’ या अद्धा त्रितालातील भैरवीने केली, त्यात मूर्छना करून दाखवली आणि रसिकांना तृप्त केले.

संवादिनीवर राहुल गोळे व तबल्यावर विवेक भालेराव यांनी सुंदर साथसंगत केली. तानपुऱ्यावर तेजस कोपरकर व ईश्वर घोरपडे यांनी तर टाळाची साथ सुरेश कुलकर्णी यांनी केली. अडीच तास चाललेल्या या अवीट कार्यक्रमाची साठवण कायमच तळेगावकर रसिकांच्या मनात कायमची कोरली गेली.

या वर्षीचा श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने दिला जाणारा ‘सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कार तळेगावातील कलापिनी,श्रीरंग कलानिकेतन (माजी अध्यक्ष) आणि संस्कार भारती या अखिल भारतीय संस्थेत कार्यरत असलेल्या प्रकाशराव जोशी यांना प्रदान करण्यात आला .

कार्यक्रमाचे ध्वनीसंयोजन हेमंत उत्तेकर यांचे होते. श्रीकांत चेपे यांनी छायाचित्रण केले. समीर नरवडे यांनी कार्यक्रम फेसबुकवर ऑनलाईन प्रसारण करण्यासाठी सहाय्य केले. या कार्यक्रमासाठी तळेगावातील उद्योजक संजय साने, डॉ.अरविंद लांडगे यांनी अर्थसहाय्य केले. मागील वर्षी श्रीरंग कलानिकेतनचे संस्थापक कै.पं.शरदराव जोशी यांचे दुःखद निधन झाले, त्यांची या समारोहातली अनुपस्थिती जाणवणारी आहे. त्यांच्या आशीर्वादावरच संस्था यापुढे वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

सूत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंग कलानिकेतनच्या रवींद्र धारणे, संजय साने, सुखेंदू कुलकर्णी,राजीव कुमठेकर, विनय कशेळकर, दीपक बिचे, विलास रानडे, सीमा आवटी, लक्ष्मीकांत घोंगडे, प्रदीप जोशी, दीपक आपटे, सुहास धस, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, विश्वास देशपांडे, उद्धव चितळे, डॉ. किरण देशमुख आणि निरुपा कानिटकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.