Talegaon Dabhade: तळे सुशोभीकरणातील अनागोंदी प्रकरणी दोषींवर कारवाई करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या तळे सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली अनागोंदी आणि अनियमितता सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी व पंचनामा करून तातडीने अहवाल बनवावा व संबधित दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) तहसीलदारांना दिल्या.

आमदार शेळके आणि तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी तळेगाव स्टेशन येथील तळ्याला समक्ष भेट देऊन पाहणी केली. या कामाचा अहवाल व पंचनामा  लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या धोरणानुसार तळेगाव शहरातील  ईगल कंपनीच्या पाठीमागे तळे सुशोभीकरणाच्या कामात अनागोंदी झाली असून याबाबतच्या तक्रारी शासनाकडे आणि नगर परिषदेकडे आल्या आहेत. तहसीलदार मधुसुदन बर्गे व त्यांचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

या तळ्यातील गाळ, मुरूम म्हणजेच गौणखनिजे शासनाची कोणतीही परवानगी न घेता काढली व त्याची परस्पर विल्हेवाट लावली असल्याच्या तक्रारी आमदार शेळके व शासनाकडे आल्याने त्याची दाखल घेऊन शासकीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विरोधीपक्षनेते गणेश खांडगे, जनसेवा समितीच्या गटनेत्या सुलोचनाताई आवारे, नगरसेवक गणेश काकडे, रवींद्र आवारे , अरुण माने, रोहित लांघे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, माजी नगरसेवक सुनील करंडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड तसेच नगर परिषदेचे अभियंते व शासकीय अधिकारी पाहणीच्या वेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.