Talegaon Dabhade : ‘नाम’ हेच ईश्वरापर्यंत पोहचण्याचे श्रेष्ठ साधन -हभप विश्वनाथ महाराज वारींगे

एमपीसी न्यूज – संत नेहमी नामस्मरणाचा आग्रह धरतात. नामाचा उच्चार करायला सांगतात कारण नाम हेच ईश्वरापर्यंत पोहचण्याचे श्रेष्ठ साधन आहे. असे हे नाम जो इतरांच्या मुखातून वदवितो तो दाता श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन हभप विश्वनाथ महाराज वारींगे यांनी केले. आमदार सुनील शेळके व विठ्ठल परिवार मावळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवामध्ये आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरुपी सेवा हभप विश्वनाथ महाराज वारींगे (मुंबई) यांच्या वाणीने पार पाडली.

अभंगाचे निरुपण करताना महाराज सांगतात की, मनुष्याने आपल्या वाणीचा उपयोग योग्यरीत्या केला पाहिजे, वाणीमधून येणाऱ्या शब्दाला खूप किंमत आहे. एरवी सर्व सामान्य व्यक्ती कितीही शब्द बोलला तरी त्याला एवढी किंमत नसते परंतु संत किंवा अधिकार संपन्न महात्मे जर काही बोलले तर त्यांच्या प्रत्येक शब्दाला खूप किंमत असते नव्हे नव्हे तर प्रत्येक शब्द हा वेदतुल्य असतो म्हणून मोठ्यांच्या शब्दाला खूप किंमत असते.

या कार्यक्रमाचे आयोजन करणारे सुनील आण्णा शेळके हे दानशूर व्यक्तिमत्त्व आहे. सुनील अण्णांनी राजकारणाचा परमार्थ केला. राजकारण व धर्मकारण याची एकत्रित सांगड घालून दोघांमधला भेद संपविला, असे विधायक काम करणारा माणूस दुर्मिळ असतो. त्याच्या राजकारणाचा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही.

जगामध्ये देवाने संत नावाची जात ही परोपकारासाठी निर्माण केली आहे. संत ज्या जातीत जन्माला येतात दुर्दैवाने आपण त्यांना त्याच जातीपुरते मर्यादित ठेवतो. वास्तविक पाहता संतांना जात नाही, आपण त्यांना विशिष्ट जातीमध्ये बांधू नये. परोपकार हा संतांचा धर्म असून भगवंताशी एकनिष्ठ दास्यत्व हीच त्यांची जात आहे. याउलट जर आपण त्यांच्या जातीमध्ये बसलो तरच आपल्याच जीवनाचा उद्धार आहे. संगत व पंगत नेहमी मोठ्यांची करावी. नेहमी अधिकाराने परिपूर्ण असलेल्या व्यक्तींसोबत पंगतीला बसावे, त्याने केवळ सामान्य जीवाचे हित आहे.

संत जगाला केवळ प्रेम देतात, ते जगाशी प्रेमाने दयेनेच वागतात मात्र भांडायचे झाले की देवाशी भांडतात. अधोगतीला जाणाऱ्या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी विनंती करतात, तर कधी प्रसंगी कठोर वाणी ही वापरतात. आणि तरीही ऐकले नाही तर त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना विनवणी करतात. आई आपल्या मुलाला कधी कधी रागात बोलते शिव्या देते पण त्याचा मुलाला राग येत नाही, कारण ते सर्व त्याच्याच हितासाठी असते, तसे संत प्रसंगी कठोर वाणी वापरतात पण ते सर्व त्या जडजीवांच्या उद्धारासाठी व हितासाठी उपयुक्त असतात.

जनकल्याण ही एकच तळमळ त्यांच्या मनात असते आणि त्यासाठी ते या समाजाच्या पायाही पडतात. प्रत्येक जीव हा शिव स्वरूप आहे याची जाणीव ते करून देतात, मनुष्याला त्याचा देहाची व त्याच्या जन्माची किंमत समजावून सांगतात. मनुष्याचे शरीर खूप मौल्यवान आहे, माणसाला त्याला स्वतःला मिळालेल्या देहाची किंमत कळत नाही, केवळ वासनेच्या उपभोगापोटी तो हा देह खर्च करत असतो, जीच्याकडून केवळ दुःखच प्राप्त होते अशी ही दुःखाला कारणीभूत ठरणारी वासना ही मनुष्यासाठी विष आहे तरीही मनुष्य त्या विषाची परीक्षा घेतोच. जोवर शरीर चांगले आहे तोवर परमार्थ चांगला होतो. शरीर हीच कथेची उत्तम सामुग्री आहे.

परमार्थ हा काया वाचा व मनाने संपन्न होतो. म्हणून ज्याचे शरीर चांगले त्याचा परमार्थ चांगला, परमार्थ करत असताना उपासना अनेक देवाची होते परंतु ध्यान मात्र एकाच देवतेचे असले पाहिजे, एखाद्या मनुष्याची नावे भिन्न असतात परंतु भिन्न नावामुळे व्यक्ती बदलत नाही तशी देवाची रूपे वेगळी असली तरी स्वरूप मात्र एकच आहे. भगवंताची जरी अनंत नावे असली तरी स्वरूप एक आहे, तो अनेकत्वाने नटलेला आहे, असा या व्यापक परमात्मा जीवाला भेटावा म्हणून आणि जीव-शिव ऐक्य व्हावे म्हणून संत आपला देह चंदनापरी झिजवतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.