Talegaon Dabhade : वृत्तपत्र विक्रेत्याने अनोख्या पद्धतीने केले आमदार सुनील शेळके यांचे अभिनंदन!

एमपीसी न्यूज – अभिनंदन करायच्या पद्धती काळाप्रमाणे बदलत असल्या तरी काहीजण त्यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करीत असतात. सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेले अभिनंदन कायमचे लक्षातही राहते.  तळेगावमधील एका वृत्तपत्र विक्रेत्याने मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचे अशाच अनोख्या पद्धतीने अभिनंदन करीत वाहवा मिळवली आहे.

विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन मावळात इतिहास घडविणाऱ्या सुनीलआण्णांवर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. त्यातच वृत्तपत्र विक्रेते प्रशांत लोणकर यांनी चक्क पेपर बिलाच्या तळाशी सुनीलआण्णांच्या जाहिरात छापून ‘हटके’ पद्धतीने अभिनंदन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लोणकर यांच्या या कल्पकतेला ग्राहकांबरोबरच स्वत: आमदार शेळके यांनीही दाद दिली.

तळेगावच्या शुक्रवार पेठेतील परीट आळीत राहणारे प्रशांत लोणकर हे ओंकार न्यूज पेपर एजन्सी चालवतात. लोणकर हे सुनील शेळके यांचे चाहते आहेत. सुनीलआण्णा आमदार व्हावेत, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. विक्रमी मताधिक्याने सुनीलआण्णा निवडून आल्यानंतर लोणकर यांनाही खूप आनंद झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी भन्नाट शक्कल लढवली. लाईट बिल, फोन बिल आदी बिलांवर वेगवेगळ्या उत्पादनांच्या व सेवांच्या जाहिराती त्यांनी पाहिल्या होत्या. लोणकर यांना दरमहा ग्राहकांना पेपर बिल द्यावे लागते. या बिलाच्या खाली लोणकर यांनी सुनील शेळके यांच्या अभिनंदनाची जाहिरात छापून घेतली आणि पेपर बिलांबरोबर त्यांनी त्यांच्या भावनाही लोकांपर्यंत पोहचवल्या.

अभिनंदनाचे मोठमोठे फ्लेक्स लावणे, वृत्तपत्रे किंवा टीव्हीवर जाहिरात देणे अशा पद्धती सध्या लोकप्रिय आहेत. त्याचा खर्च सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियावर अभिनंदनाच्या पोस्ट टाकण्यावर अनेकजण भर देताना पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी खर्चात आपल्या व्यवसायासाठी आवश्यक बिल बुकात अभिनंदनाची जाहिरात छापून लोणकर यांनी जाहिरातीच्या युगात ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.