Talegaon Dabhade: दुय्यम निबंधक कार्यालयात पाच दिवसांत केवळ पाच दस्तांची नोंदणी

Talegaon Dabhade: Registration of only five documents in five days in Sub Registrar Office

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गामुळे सुरू असलेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालय (मावळ-2)  सुरू होऊनही कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे नागरिक दस्तऐवजांची नोंदणी करून घेण्यासाठी कार्यालयात येत नसल्याचे चित्र आहे.

तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील हे कार्यालय अक्षरशः कोरोनाच्या भीतीने दस्त नोंदणी पासून ओस पडले आहे. कार्यालय सुरु होऊन पाच दिवस झाले आहेत; मात्र या पाच दिवसात अवघे पाच दस्त ऐवज या कार्यालयात नोंदविले आहेत.

तळेगाव दाभाडे येथील मावळ दुय्यम निबंधक कार्यालय -2 हे सतत गर्दीचे कार्यालय म्हणून ओळखले जाते. या कार्यालयात तळेगाव आणि मावळ परिसरातील नागरिक हे आपण घेतलेल्या घराचे (सदनिका), जमिनीचे खरेदी खत नोंदविण्यासाठी येतात. तसेच या ठिकाणी विविध व्यवसायाचे करारनामे, गहाणखते, कुलमुखत्यार नोंदणी होत असते. शासनास या नोंदणीमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो.

राज्यात  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य व केंद्र शासनाने जमाव बंदी, संचार बंदी, लॉकडाऊन सुरु केल्यानंतर राज्य शासनाने हे कार्यालय दिनांक 23 मार्च पासून 18 मे पर्यंत बंद ठेवले होते. गेली पाच दिवसापासून हे कार्यालय सुरु करण्यात आल्याचे दुय्यम निबंधक मानसी गायकवाड यांनी सांगितले.

या  कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव  होऊ नये म्हणून सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कार्यालयात रोज औषध फवारणी करण्यात येत आहे. तोंडाला मास्क लावणे व सुरक्षित अंतराचे सर्व नियम देखील पाळले जात असल्याचे गायकवाड यांनी सागितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.