Talegaon Dabhade : भरदिवसा वृध्दाचे हातपाय बांधून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा वृध्दाचे हातपाय बांधून त्यांना लोखंडी गजाचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तळेगाव दाभाडे मधील सोमवार पेठ येथे सोमवारी (दि. 29) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

सुरया अब्दुल तांबोळी (वय 65, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी हे एकटे घरी असताना अज्ञात दोन चोरटे जबरदस्तीने त्यांच्या घरात आले. चोरट्यांनी तांबोळी यांना लोखंडी गजाचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय बांधून ठेवले. तसेच जिवे मारण्याची धमकी देत एक लाख 40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राजमाता हार, 80 हजार रुपये किमतीच्या सहा तोळ्यांच्या दोन बांगड्या, दहा हजार रुपये किमतीचे कर्णवेल, वीस हजार रुपयांचे आयरीन, साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि एक लाख 66 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख 76 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गवारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.