Talegaon Dabhade : सरसेनापती उमाबाई राजे दाभाडे यांच्या 269 पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळावर आदरांजली अर्पण

एमपीसी न्यूज –  हिंदवी स्वराज्याच्या एकमेव सरसेनापती उमाबाई राजे दाभाडे यांच्या 269 व्या जयंतीनिमीत्त तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) त्यांच्या समाधी स्थळावर आज (सोमवारी) पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उमाबाई राजे दाभाडे यांचे वंशज सरदार सत्यशीलराजे दाभाडे, त्यांच्या पत्नी दिव्यलेखा राजे दाभाडे,सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुबोध दाभाडे, संस्थापक संतोष दाभाडे, माजी नगरसेवक सुरज दाभाडे, भाजप तळेगाव शरहाध्यक्ष रविंद्र माने, निरंजन भेगडे, अड. विनय दाभाडे, संपत दाभाडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सीईओ विजयकुमार सरनाईक आदी उपस्थित होते.

यावेळी सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी इतिहासातील दाभाडे या राज घराण्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले की, हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मराठा घराण्यांनी बलिदान दिले. त्यामध्ये सेनापती दाभाड्यांच्या घराण्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दाभाडे घराणे मुळचे गुजरातमधील डभई चे. या घराण्यातील बजाजी दाभाडे गुजरातमधून महाराष्ट्रात आले. त्यांचे पुत्र यसाजी हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते.

शिवाजी महाराजांच्या जवळच्या विश्वासू लोकांपैकी ते एक होते…येसाजी दाभाड्यांना खंडेराव व शिवाजी असे दोन पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांबरोबर जिंजीच्या प्रवासात येसाजी, खंडेराव व शिवाजी हे तिघे होते. सन 1697 च्या अखेरीस राजाराम महाराज परत निघाले (Talegaon Dabhade) असता, मुघल झुल्फिकार खानने जिंजीस वेढा घातला. राजाराम महाराज येसाजी व दाभाडे बंधू सोबत बाहेर पडले. मुघल त्यांचा पाठलाग करीत होते. खंडेराव व शिवाजी दाभाडे यांनी राजाराम महाराजांना सुरक्षित स्थळी आणले.

Ruturaj Gaikwad : पिंपरी-चिंचवडकर ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच षटकात ठोकले सात षटकार

खंडेराव यांना वेळोवेळी अनेक इनामे व वतने मिळाली. त्यांना एकूण 1 हजार 395 गावांची सरपाटीलकी म्हणजे जवळ जवळ 700 गावांची देशमूखी मिळाली. याखेरीज पाटील, देशमुख, राजदेशमुख, सरदेशमुख, सरदेश कुलकर्णी, अठरा कारखान्याचे हवालदार, इनामदार, मोकासदार, सेनाखासखेल वगैरे हुद्देही त्यांच्याकडे होते. पुढे 11 जानेवारी 1717 रोजी छत्रपती शाहुमहाराज यांनी खंडेराव दाभाडे यांची नेमणूक मराठा सम्राजाच्या ‘सरसेनापती’ पदावर केली. याच सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या उमाबाईसाहेब या पत्नी होत.उमाबाई दाभाडे अत्यंत कर्तबगार , हुशार, शूर व जिद्दी होत्या त्या खानदेशातील अभोणकर देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होत.

लहानपणीच उमाबाईंनी घोड्यावर बसणे व तलवार चालवण्याचे शिक्षण घेतले. बालपणी एक दिवस करवीर संस्थानाच्या संस्थापिका ताराराणी यांच्या दागिन्याच्या डब्यातून त्याचे सोन्याचे तोडे उमाबाईंनी स्वतःच्या पायात घातले. हे पाहताच त्यांचे सासरे येसाजींनी त्यांना ताबडतोब काढून ठेवण्यास सांगितले. (Talegaon Dabhade)सोन्याचे तोडे घालण्याचा मान फक्त राजघराण्यातील स्त्रियांना असतो. तो दाभाड्यांना नाही असे समजाविले. जिद्दी स्वभावामुळे आपणही हा मान मिळवायचा, असे स्वप्न उमाबाईंनी बाळगले.

पुढे एका ज्योतिषाने पायात सोन्याचे तोडे घालतील; पण लोखंडाच्या साखळदंडही घालतील, असे भाकित केले व ते खरेही ठरले. खंडेराव व उमाबाई यांना त्रिंबकराव, यशवंतराव व बाबुराव अशी तिन मुले होती. 1729 मध्ये खंडेरावांचे निधन झाले. त्यांचे थोरले पूत्र त्रिंबकराव सेनापती झाले.

त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात चौथाईवरून वाद होता. गुजरातेत बडोद्यानजिक उभई येथे 1 एप्रिल 1731 रोजी बोलाचाली व वाटाघाटी सुरू असता दोघामध्ये युद्ध सुरू झाले व त्रिंबकरावांचा त्यात अंत झाला. हे उमाबाईंना कळताच त्या रागाने चवताळून उठल्या व त्यांनी बाजीरावाच्या कृत्याचा सूड घेण्याचे ठरविले. त्या मागे लागताच बाजीराव छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयास गेले.

बाजीरावांना घेऊन शाहूमहाराज तळेगावास गेले व उमाबाईंचे सात्वन करून बाजीरावांना त्यांच्या पायावर घालून उमाबाईंचा राग शांत केला. यावेळी शाहूमहाराजांनी उमाबाईंना शुभचिन्ह म्हणून सोन्याचे सूर्यफूल दिले.1732 मध्ये अहमदाबादेवर जोरावरखान नावाचा मोघल सरदार चाल करून आला. शाहु महाराजांनी उमाबाईंना त्याचे पारिपत्य करण्यासाठी अहमदाबादेस पाठविले. मराठी सैन्य अहमदाबादेस पोहोचले.

 

या सैन्याची सेनापती एक स्त्री आहे हे पाहून जोरावरखानाने उमाबाईंना एक पत्र लिहिले…,

‘तू एक विधवा आहेस, तुला लहान मुले आहेत. आम्ही तुला हरविले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेला येऊ नकोस. ज्या रस्त्याने आली आहेस त्याच रस्त्याने परत जा.’ हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरविले, की लढाई जिंकुनच परत येईन. अहमदाबादच्या किल्याबाहेरच युद्ध सुरू झाले. पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या. त्यांच्याजवळ निरनिराळी शस्त्रे होती.

जोरावरखानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्यांने त्यांनी धुव्वा उडविला. हे पाहून जोरावरखान किल्याच्या आत जाऊन लपून बसला. किल्याचे दरवाजे आतून बंद केले. उमाबाई दाभाडे याना दरवाजाच्या आत शिरायचे कसे हा प्रश्न पडला. तेंव्हा सैन्याच्या मृतदेहाचे ढीग दरवाजाला लावून, एकावर एक रचून पेटवून दिले.दरवाजा पडला व मराठा सैन्य आत शिरले. जोरावरखानला जेरबंद करून साताऱ्यास आणले व त्या तळेगावी परतल्या.

अहमदाबादेतील शौर्यावर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज हे उमाबाईंचा गौरव करण्यास तळेगावी आले. तळेगावात मोठा दरबार भरवण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू, पांढरी शाल, दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले. लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाईंचे स्वप्न पूर्ण झाले. त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगावच्या सरसेनापती दाभाडे घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला.

1751 मध्ये पेशव्यांनी दाभाड्यांना पुण्यात नजरकैदेत ठेवले होते. उमाबाईंनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यातली काही मंडळी 16 नोव्हेंबर 1751 ला कैदेतून पळाली, तेंव्हा उमाबाई व त्यांची सून अंबिकाबाई यांना सिंहगडावर कैदेत ठेवले.

14 फेब्रुवारी 1752 ला उमाबाईंना पुण्यात आणण्यात आले.शनिवारवाड्या नजिक ओंकारेश्वरा जवळ नडगेमोडी येथे त्या राहिल्या. याच डेर्यात असताना 28 नोव्हेंबर 1753 रोजी उमाबाईंचे निधन झाले. अशाप्रकारे मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सेनापतीने जगाचा निरोप घेतला. इतिहास त्यांच्या शौर्याला कदापि विसरणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.