Talegaon Dabhade: प्रवेशद्वार सीलबंद-खुले-पुन्हा सीलबंद! आता प्रांतअधिकारी यांचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात कराव्या लागणाऱ्या नगर व्यवस्थापनाबाबत काही लोकांच्या सततच्या ढवळाढवळीमुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड बेजार झाले असून अखेर त्यांनी मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा कोविड-19 घटना व्यवस्थापक संदेश शिर्के यांच्याकडे धाव घेतली आहे. लिंब फाटा पूर्ण बंद करावा म्हणून झिंजाड यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख करून शिर्के यांनी तळेगावात प्रवेश फक्त वडगाव फाटा चाकण रोडवरून करण्याची विनंती मान्य केली आहे. लिंब फाटा येथून गावातील प्रवेश बंद करण्यात यावा म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी मदत करण्याची सूचना आदेशात केली आहे.

पुणे मुंबई महामार्गाकडून तळेगाव शहरात येण्यासाठीचे सर्व प्रवेश मार्ग बंद करून वडगाव फाट्यावरून चाकणमार्गे आत येणाराच मार्ग खुला राहणार असल्याचा आदेश मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने मंगळवार (दि. 28) रोजी लिंब फाटा येथील तळेगावात येणारा प्रवेश बंद ठेऊन फक्त वडगाव फाट्यावरून चाकणमार्गे तळेगावात प्रवेश करता येईल असे बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन केले होते. त्यास काही स्थानिकांनी विरोध केल्याने दि. 29 रोजी सदर लिंब फाटा मार्ग खुला करून वाहतूक सुरु करण्यात आली होती.

आज गुरुवारी (दि 30) दुपारी उपविभागीय अधिका-यांचा आदेश आल्याने पुन्हा हा लिंब फाटा येथून तळेगावात येणारा रस्ता बंद करण्यात आल्याचे तळेगाव नगरपरिषद प्रशासनाने जाहीर केले आहे. तर गावात येण्यासाठी आता वडगाव फाट्यावरून चाकण रस्त्याने येणे हा एकमेव मार्ग राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.