Talegaon : तळेगावात अर्धा किलो गांजा जप्त; तरुणाला अटक

Half a kg of cannabis seized in Talegaon; The youth was arrested

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे अर्धा किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास जागृती चौकात करण्यात आली.

सुशील अनिल साबळे (वय 28, रा. वडगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई डी. आर. धस यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील एका कापडी पिशवीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथील जागृती चौकात सार्वजनिक रस्त्यावर सापळा लाऊन सुशील याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये 450 ग्राम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी 11 हजार 250 रुपयांचा गांजा आणि 140 रुपयांची रोख रक्कम जप्त करत सुशील याला अटक केली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाची तळेगाव दाभाडे येथे कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी (दि. 21) तळेगाव दाभाडे येथे केलेल्या कारवाईमध्ये पुनमचंद भानुभाई राठोड (वय 26, रा. कातवी रोड, तळेगाव दाभाडे) या तरुणाला अटक करण्यात आली. आरोपी राठोड याने गुटखा व पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगला. तसेच त्या मालाची बिले राठोड याच्याकडे नव्हती, यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे (वय 53) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.