Talegaon News : घोरावडेश्वर डोंगरावर डोळ्यात मिरची पावडर टाकून पळवले मंगळसूत्र!

एमपीसी न्यूज – घोरावडेश्वर मंदिर येथे गेलेल्या एका दांपत्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री सात वाजताच्या सुमारास घोरावडेश्वर डोंगराच्या पाय-यांवर घडली.

श्रीकृष्ण गंगाधर दराडे (वय 29, रा. वाकडकर वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्यादी दराडे त्यांच्या पत्नीला घोरावडेश्वर मंदिर दाखविण्यासाठी गेले होते. मात्र घोरावडेश्वर डोंगराच्या अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर रात्र होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अंधार होईल म्हणून ते अर्ध्यातून परत खाली उतरत होते.

त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने दराडे यांना बाजूला ढकलले. त्यानंतर दराडे आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि पत्नीच्या गळ्यातील 60 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.