Talegaon News : या कोरोना संकटकाळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीकडे पालकांनी गांभीर्याने पहावे – प्रा.गणेश शिंदे

तळेगाव दाभाडे – कोरोनाच्या या भयावह संकटाला संपूर्ण जगालाच सामोरे जावे लागत आहे. अशा या संकटकाळात शिक्षण हा विषय काही काळासाठी, वर्षभरासाठी ठप्प करून चालणार नाही. तर या आव्हानांवर मात करीत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपण विद्यार्थ्यांसाठी ही आभासी म्हणजेच ऑनलाईन शिक्षणप्रणाली यशस्वीपणे पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही या शिक्षणप्रणालीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे, पालकांनी अतिशय सजग राहून या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सहभाग दाखवावा, यासाठी पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधणे याकडे अतिशय संवेदनशीलतेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यातूनच ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली गुणवत्तापूर्ण व यशस्वी ठरणार आहे असे मत महाराष्ट्रातील युवा व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटकाळात अनेक मर्यादांचा सामना करीत ऑनलाइन पद्धतीने शिक्षणप्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे ही तारेवरची कसरत होत आहे. अशा काळात विशेषत: पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन शिक्षणप्रणालीत विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरत आहे हे लक्षात घेऊन पालकांच्या जागृतीसाठी संत साहित्याचे व इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक, विचारवंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. गणेश शिंदे यांचे ‘आभासी शिक्षण पद्धतीत पालकांची जबाबदारी’ या विषयावर श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलने झूमॲपच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रा. गणेश शिंदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

या व्याख्यानाला पालक बंधू-भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला. या व्याख्यानाच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधत असताना स्वामी विवेकानंद यांचा दाखला देत “माणूस आपोआप शिकत असतो. फक्त त्यास शिकण्यासाठी पोषक वातावरण त्याच्या अवतीभवती निर्माण करणे महत्त्वाचे आहे” हे स्वामी विवेकानंदांचे विचार प्रतिपादन करून आजच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपण विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षणप्रणाली यशस्वीपणे पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही अतिशय सजग राहून या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सहभाग दाखवावा, यासाठी पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधणे याकडे अतिशय संवेदनशीलतेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यातूनच ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली गुणवत्तापूर्ण व यशस्वी ठरणार आहे. याशिवाय शाळेच्या माध्यमातूनही विशेष कष्ट घेवून ही ऑनलाईन शिक्षणप्रणाली यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष कष्ट घेतले जात आहे याचेही विशेष कौतुक सरांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी केले. व्याख्यांतांचा परिचय पालक प्रतिनिधी प्रशांत जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.