Talegaon News : टोल भरण्यास सांगितल्याने उर्से टोलनाक्यावरील कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज – टोल भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने टोल नाक्यावर काम करणाऱ्या कामगाराला काचेच्या ग्लासने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 11) मध्यरात्री बारा वाजता उर्से टोल नाक्यावर घडली.

गजानन पितांबर शिंदे (वय 29, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर काम करतात. शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास एम एच 46 / बी के 1516 ही कार टोल नाक्यावर आली. फिर्यादी यांनी ही कार टोल भरण्यासाठी थांबवली. त्यावेळी आरोपी कार चालकाने टोल भरण्यास नकार दिला. कार मधून खाली उतरून आरोपीने फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील काचेच्या ग्लासने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले आणि निघून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.