Dapodi Crime News : कारमधून जाणाऱ्या व्यवसायिकास टोळक्याने लुटले; आठ वाहने फोडली

एमपीसी न्यूज – सात जणांच्या टोळक्याने कारमधून घरी जात असलेल्या व्यावसायिकाला रस्त्यात अडवले. व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले आणि कारची तोडफोड केली. त्यानंतर परिसरातील सात वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 11) मध्यरात्री किनारा हॉटेलजवळ, दापोडी येथे घडली.

आलीम अब्दुलागफूर मलिक (वय 26, रा. गुरव पट्टा, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर वाल्मिकी, प्रणव उर्फ सोन्या कांबळे, ऋतिक जावीर, संकेत उर्फ महादया पवार, चिक्क्या उर्फ राहुल साळवे, इम्या, अक्षय उर्फ जंगल्या भालेराव (सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या कार मधून घरी जात होते. किनारा हॉटेल समोर, दापोडी येथे आरोपींनी फिर्यादी यांची कार अडवली. त्यांना कार मधून बाहेर उतरवले. त्यांच्या कारची काच फोडून नुकसान केले. त्यांनतर कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून 1500 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड तसेच कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतले.

तिथून निघून जात असताना आरोपींनी वसीम शरीफ अन्सारी यांची रिक्षा, नयिम अल्लावाली बागवान यांचा टेम्पो, अब्दुल गफूर बागवान यांचा पॅगो टेम्पो, मोसीन खान यांची रिक्षा, इकबाल खान यांचा टेम्पो, मोबिन बागवान यांचा टेम्पो, मेहमूद बागवान यांचा टेम्पो अशा सात वाहनांच्या काचा फोडून सुमारे 30 हजारांचे नुकसान केले. यामुळे सामान्य लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.