Ralegansiddhi News : गिरीश प्रभुणे यांचा अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताब प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यादवबाबा मंदिर, राळेगणसिद्धी, अहमदनगर येथे शनिवारी (दि.11) हा सत्कार कार्यक्रम पार पडला.

यावेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी, क्रांतिवीर चापेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ कोरडे, गतिराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी अण्णा हजारे म्हणाले, ‘गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास खूप खडतर असला तरी तो समाजासाठी प्रेरणादायी आहे. पद्मश्रीपेक्षाही अधिक उत्तुंग सन्मान त्यांच्या वाट्याला यावेत, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो!’

सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘निमगाव म्हाळुंगी येथे 1983 साली माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळातच अण्णांसारख्या ऋषितुल्य अन् कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मला लाभल्या. त्या बळावर त्या परिसरातील पाणीटंचाई तसेच अनेक सामाजिक समस्या मार्गी लावता आल्यात, या गोष्टीचे मोठे समाधान आहे!’

सत्काराच्या प्रारंभी कवी भरत दौंडकर यांनी आपल्या ‘गोफ’ या प्रसिद्ध कवितेचे सादरीकरण केले. सुरेश कंक, आसाराम कसबे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले.

प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.