Tathawade News : ताथवडे येथील नृसिंह मंदिर ; एक पुरातन ठेवा !

एमपीसी न्यूज – ताथवडे गावात विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहांचे मंदिर आहे. ताथवडे गावचे हे ग्रामदैवत असून, मंदिरात नृसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती नवव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविला जातो. तसेच, मंदिराचा गाभारा पेशवे कालीन असल्याचे येथील गावकरी सांगतात. गावकऱ्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.

प्रसिद्ध मूर्ती अभ्यासक बबलू चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहाची मूर्ती सुशोभित करण्यात आली आहे. मूर्तीची पुनर्रचना करताना जवळपास दोन पोती शेंदूर निघाला व पुढे हरिहरेश्वर येथील समुद्रात हा शेंदूर अर्पण करण्यात आला. नृसिंह मंदिराचे बांधकाम हे दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले असून तमिळनाडू येथून कुशल शिल्पकारांनी मंदिराची अंतर्गत व बाहेरील शिल्पकला केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. त्यानंतर विष्णूंचा नृसिंह अवतार प्रकट झाला. वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.

नृसिंह जयंती निमित्त दरवर्षी ताथवडे येथील नृसिंह मंदिरात हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. नवरात्रीत नऊ दिवसाचा उत्सव साजरा करण्यात येतो. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. ताथवडे गावातील सर्व ग्रामस्थ मिळून हा उत्सव आनंदाने साजरा करतात.

याच मंदिराच्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे किर्तन झाले होते. तसेच, श्री मोरया गोसावी यांनी या गावात तपश्चर्या केली असून, अनेकदा ते नृसिंहाचे दर्शन घेत, असे गावकरी सांगतात. त्यामुळे ताथवडे येथील नृसिंहाचे हे मंदिर ख-या अर्थाने पुरातन ठेवा आहे.

ताथवडे नृसिंह मंदीराचा कार्यभार नृसिंह म्हतोबा हनुमान देवस्थान ट्रस्ट ताथवडे, नृसिंह भजनी मंडळ व ताथवडे ग्रामस्थ पाहतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.