Pune Crime News : प्राण्यांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस, 1500 हून अधिक सरडे, कासव आणि मासे जप्त

एमपीसी न्यूज – प्राण्यांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांना पुणे ते लोणावळा दरम्यान मार्ग पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या जागेची तपासणी केली असता 1500 हून अधिक सरडे, कासव आणि मासे आढळून आले.

तरुणकुमार मोहन (वय 26, चेन्नई) आणि श्रीनिवास कमल (वय 20, तामिळनाडू) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून आफ्रिकन जातीची 230 हून अधिक कासव आणि 1200 हून अधिक वेगवेगळ्या जातीचे सरडे आणि 230 हून अधिक मासे जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना रेल्वे गाड्यांमधून आंतरराष्ट्रीय प्राण्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके मागील काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. दरम्यान 25 मे रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई एलटीटी एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या दोन प्रवासांची हालचाल संशयास्पद वाटली.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असणाऱ्या 4 बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये हे सर्व प्राणी आढळले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नसल्याने त्यांना ताब्यात घेतले आणि हे सर्व प्राणी जप्त केले. प्राथमिक चौकशीत हे सर्व प्राणी त्यांनी चेन्नई येथून मुंबई येथे घेऊन जाणार होते. यातील काही प्राणी विदेशी असल्याने ते सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात सोपवण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघांनाही सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.