Pimpri : सावरकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार इतर शंभर पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ-खासदार गिरीश बापट

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य व्यक्तिमत्व आहेत. सावरकर म्हणजे देशभक्तीचा विचार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार इतर शंभर पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात खासदार बापट बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण धबडगाव, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, कामगार, पर्यावरण मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अमित गोरखे, सावरकर मंडळाचे अध्यक्ष एस बी पाटील, कार्याध्यक्ष विनोद बन्सल, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, मिलिंद देशपांडे, अप्पा गवारे, डॉ. गिरीश आफळे भाजपच्या प्रदेश सचिव उमा खापरे,  नगरसेविका अनुराधा गोरखे, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर, नगरसेवक  अमित गावडे, केशव घोळवे गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, भाऊ अभ्यंकर, विनायक थोरात आदी उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांना यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, “निवडून आल्यानंतर अनेक सत्कार होतात. पण, विचारांचा सत्कार होणं फार आवश्यक आहे. सावरकर मंडळ ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून काम करत आहे. सावरकर मंडळाचा सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्तीचा विचार सतत प्रेरणा देत असतो. त्यामुळे सावरकर मंडळाकडून होणारा सन्मान इतर अनेक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. सावरकरांच्या जीवनाचे कवी, लेखक, राजकारणी, भाषा सुधारक, विज्ञानवादी, क्रांतिकारक असे अनेक पैलू आहेत. त्यांची शिकवण आजच्या पिढीला करून देणं गरजेचं आहे. आमचं आज जे नाव आहे, ते संघटनेमुळं आहे. आमच्यासाठी संघटना महत्वाची आहे. सावरकर मंडळाने केलेला सत्कार हा विचारांचा सत्कार आहे. संघविचाराचा सत्कार आहे. या सत्कारामुळे भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “आजवरच्या कारकिर्दीसाठी संघ आणि परिवाराची मोठी मदत झाली आहे. संघ परिवाराशी वैचारिक जोड असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून होणारा सन्मान माझ्यासाठी महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यास भविष्यात काम करण्यासाठी उत्साह येतो. हा माझा सन्मान नसून मावळच्या जनतेचा सन्मान आहे.

अमित गोरखे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही गोष्टी जरी आपण शिकलो तरी जीवनाचं सार्थक होईल. महामंडळाच्या माध्यमातून अनके चांगली कामे करणार आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.”

नाना जाधव म्हणाले, “मोदी सरकारकडे राष्ट्रप्रेमाला तोड नाही. देशहिताची बांधिलकी असलेले सर्व उमेदवार निवडून गेले आहेत. सरकार उत्तमरीत्या काम करत आहे. मंत्री पदाच्या शपथ समारंभानंतर सर्व मंत्र्यांनी त्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली, हे देशप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. देशहिताच्या विचारांची बांधिलकी असणा-या लोकांचा सत्कार सावरकर मंडळाकडून होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शैलजा सांगळे यांनी केले. भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर, विनोद बन्सल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.