Pimpri : शहराच्या लोकसंख्यावाढीचा दर 70 टक्के, 2021 मध्ये लोकसंख्या 29 लाखावर जाण्याची शक्यता

एमपीसी न्यूज –  सन 2001 आणि 2011 च्या जनगणना दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लोकसंख्यावाढीचा दर सर्वसाधारणपणे 70 टक्के इतका आहे. याप्रमाणे लोकसंख्या वाढीचा दर अपेक्षित धरल्यास 2021 साली शहराची लोकसंख्या 29 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. 2021 च्या जनगणनेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील कामकाज 1 मे ते 15 जून 2020 दरम्यान पूर्ण केले जाणार आहे. त्याकरिता पाच हजार प्रगणक नेमले जाणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रधान जनगणना अधिकारी, अतिरिक्त आयुक्तांची शहर जनगणना अधिकारी आणि क्षेत्रीय अधिका-यांच्या चार्ज अधिकारी म्हणून नेमणूका केल्या आहेत. याबाबतचे आदेश जनगणना कार्यालयामार्फत निर्गत करण्यात आले आहेत.
महापालिकेमार्फत सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि अण्णा बोदडे यांची मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी यशदा येथे 11 ते 16 डिसेंबर 2019 दरम्यान प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर निवडणूक विभागाकडील आरेखक उत्तम भारती आणि संगणक चालक पंकज पवार यांनीही प्रशिक्षण पूर्ण केले आहे. इंदलकर आणि बोदडे हे 1 मे ते 15 जून 2020 मध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष कामकाजाचे फिल्ड ट्रेनरला प्रशिक्षण देणार आहेत. त्याकरिता आवश्यक असणारे 60 फिल्ड ट्रेनर यांची यादी माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे.
सन 2001 च्या जनगणनेमध्ये शहराची लोकसंख्या दहा लाख 6 हजार 322 तर 2011 च्या जणगणनेमध्ये 17 लाख 27 हजार 651 लोकसंख्या होती. 2011 मध्ये गटांची संख्या तीन हजार 102 होती. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष कामकाज 1 मे ते 15 जून 2020 पर्यंत पुर्ण केले जाणार आहे. या टप्प्यात नियुक्त केलेल्या प्रगणाकामार्फत प्रगणक गटनिहाय राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अद्यावत करणे. 2021 करिता मुळ गटात, उपगटात घरयादी तयार करण्याबाबतचे कामकाज केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्याचे कामकाज सुरु करण्यापूर्वी कार्यालयाने करावयाची कामे !

 

सन 2011 मधील 3102 गटांचे नकाशे कायम ठेवावेत. त्यामध्ये कोणतेही बदल न करता प्रत्येक गटामध्ये 600 ते 750 लोकसंख्या किंवा 150 घरे ग्राह्य धरावीत. मूळ गटात उपगट तयार करावेत. त्याचे काल्पनिक नकाशे तयार करून त्यांच्या सीमा निश्चित कराव्यात. त्याचबरोबर 2011 च्या जनगणनेचे कामकाज महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयामार्फत केले होते. ‘अ’ प्रभाग 727, ‘ब’ 621, ‘क’ 754 आणि ‘ड’ एक हजार अशी तीन हजार 102 गट होते.

आता महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यानुसार 3102 गटांची वर्गवारी आठ क्षेत्रीय कार्यालयात वार्डनिहाय केली जाणार आहे. मूळ गटात कोणताही बदल न करता प्रत्येक गटामध्ये 600 ते 750 लोकसंख्या किंवा 150 घरे ग्राह्य धरुन मुळ गटात उपगट तयार करुन त्याचे काल्पनिक नकाशे तयार केले जाणार आहेत. त्यानंतर 2021 च्या जनगणनेसाठी प्रत्यक्ष प्रगणक गटाची संख्या निश्चित होईल. सहा प्रगणक गटासाठी एक पर्यवेक्षक याप्रमाणे पर्यवेक्षकांची संख्या निश्चित होईल.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर असे असणार नियोजन!
क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, प्रत्येक प्रभागासाठी चार कनिष्ठ अभियंता याप्रमाणे 16 कनिष्ठ अभियंता, तेवढेच स्थापत्य सहाय्यक, मदतीसाठी प्रभागातील मीटर निरीक्षक, करसंकलन विभागाचे गट प्रमुख, सर्व्हेअर तसेच आवश्यकतेप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या नेमणूका मूळ गटातील उपगट तयार करून काल्पनिक नकाशे तयार केले जाणार आहेत. महापालिकेची 2021 साठी 29 लाख 37 हजार इतकी ग्राह्य धरल्यास एका प्रगणक गटासाठी अंदाजे 600 ते 750 लोकसंख्या धरल्यास अंदाजे 4200 अपेक्षीत गट होतील. सहा गटामागे एक पर्यवेक्षक याप्रमाणे 700 पर्यवेक्षक असे एकत्रित पाच हजार प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी नेमले जाणार आहेत.
या प्रगणक गटाची आणि पर्यवेक्षकांची संख्या निश्चित करुन 1 मे ते 15 जून 2020 मध्ये प्रत्यक्ष कामकाज करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक कर्मचारी उपलब्ध करुन घेण्यासाठी निवडणूक विभाग, संबंधित शाळा यामध्ये समन्वयक नेमणे. महापालिकेतील सर्व कर्मचारी, महापालिका शाळा, खासगी शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका यांची माहिती संकलित करावी लागणार आहे. त्याबाबतचे क्षेत्रीय कार्यालनिहाय कर्मचारी वाटपाचे कामकाज सुरु केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.