Sanskrut Vishwakosh : संस्कृत ‘ओपन डे’मुळे नागरिकांना अनुभवता आले संस्कृत शब्दांच्या विश्वकोशाचे कामकाज

एमपीसी न्यूज – डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि.24) ‘ओपन डे’ या कार्यक्रमाचे आयोजन (Sanskrut Vishwakosh) करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागामध्ये सुरु असलेला ऐतिहासिक तत्त्वांवर आधारित संस्कृत विश्वकोश हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प एका दिवसासाठी सगळ्यांकरिता खुला ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला 700 हून अधिक लोकांनी नोंदणी करून भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी जगामधील सर्वात मोठ्या अशा संस्कृत शब्दांच्या विश्वकोशाचे कामकाज कसे चालते, त्याच्या निर्मितीमधील वेगवेगळे टप्पे तसेच आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड याविषयी माहिती याप्रसंगी देण्यात आली. कोशनिर्मिती कशी होते याविषयीची सविस्तर माहिती तसेच ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी देणार्‍या अशा ह्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन झाले होते.

याप्रंसगी डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन (Sanskrut Vishwakosh) संस्थेचे कुलगुरु डॉ.प्रमोद पांडे तसेच संस्थेचे उपकुलगुरु आणि संस्कृत विश्वकोशाचे प्रधान संपादक डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले.नुकत्याच लागू झालेल्या नवीन शैक्षणिक मध्ये संस्कृतला असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता डेक्कन महाविद्यालयामध्ये तयार होणारा संस्कृत विश्वकोश हा सर्वार्थाने विशेष लक्षणीय ठरतो असे डॉ. प्रमोद पांडे यांनी नमूद केले.

ऋग्वेदापासून ते 19 व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ दीड हजार संस्कृत ग्रंथांमधून एक कोटी संदर्भांचे संकलन करून तयार केलेले स्क्रिप्टोरिअम हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असून ते पाहण्याची संधी या कार्यक्रमामध्ये लोकांना मिळाली. 1943 ते 1976 पर्यंत अनेक संस्कृत विद्वांनांनी वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल 62 विद्याशाखांमधील अनेक शब्दांचे, त्याच्या अर्थांचे आणि संदर्भांचे संकलन केले आणि ते ऐतिहासिक क्रमाने नोंदविले. हे सर्व स्क्रिप्टोरिअममध्ये विविध स्लिप्स च्या माध्यमातून जतन केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 1976 साली संस्कृत विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध संस्कृताभ्यासक (भाषातज्ज्ञ) डॉ. अ. म. घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली संपादित आणि प्रकाशित झाला. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक शब्दांचे तसेच शब्दार्थांचे संपादन तब्बल 35 खंडांमध्ये झाले असून 36 वा खंड लवकरच प्रकाशित होणार आहे.

Uday Samant : व्यापार व उद्योगवृद्धीसाठी शासनाचे सर्वोपतरी सहकार्य – उद्योगमंत्री उदय सामंत

भारताचा अभिमान आणि जागतिक आश्चर्य असणारा असा विश्वकोश काही काळातच (Sanskrut Vishwakosh) ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे असे याप्रसंगी या कोशाचे अध्यक्ष डॉ. भव शर्मा यांनी सर्वांना सांगितले. या ओपन डे कार्यक्रमामध्ये सहभागी लोकांना संपादन कक्षसुद्धा पाहता आला. ह्या संपादन कक्षामध्ये कोशनिर्मितीमधील विविध टप्पे, ग्रंथालय, शब्दार्थसंपादनाची पद्धत ह्या सगळ्याची माहिती देण्यात आली.

पुणे तसेच नाशिक, संगमनेर, सोलापूर, मुंबई अशा विविध जिल्ह्यांमधून या कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद हा लोकांमध्ये संस्कृतविषयी असणारी आस्था, आदर तसेच जिज्ञासा दर्शवितो असे या कार्यक्रमाच्या समन्वयक संहिता जोशी म्हणाल्या. या सर्व कार्यक्रमासाठी विभागातील सर्व कर्माचार्‍यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले असे या विश्वकोशाचे प्रधान संपादक डॉ. जोशींनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.