Pimpri : पिंपरी चौकात पादचारी मार्गावर पादचा-यांसाठी रस्ताच नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी कडून पुण्याकडे जाणा-या मार्गावर एका बाजूला मेट्रोच्या कामासाठी बॅरीगेट लावण्यात आले आहेत, तर दुस-या बाजूला रिक्षा स्टॉप आहे. मधल्या एका लेनमधून वाहतूक सुरु आहे. यामध्ये पादचा-यांना चालण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे आता चालायचे कुठून? असा प्रश्न पादचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौक आहे. याच चौकामध्ये प्रत्येक आंदोलन, मोर्चे, धरणे, सभा होत असतात. त्याचबरोबर अन्य राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या चौकात वाहतुकीसह नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पिंपरी कडून पुण्याच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने एका बाजूला बॅरीगेट लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अर्धा रस्ता कामासाठी वापरण्यात येत आहे. एका लेनवरून वाहतूक सुरु आहे.

मेट्रोकडून वापरण्यात आलेल्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडील बाजूस असणारा पादचारी मार्ग काढून रस्त्याची रुंदी चार मीटरने वाढविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी ही दक्षाता घेण्यात आली आहे. परंतु या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावरून वाहने धावत नाहीत. तर या रस्त्यावर चक्क रिक्षा स्टॉप बनविण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी झालेली असली तरी देखील इथल्या रिक्षाचालकांची प्रवासी शोधमोहीम सुरु असते. वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना सुद्धा हातवारे करून प्रवासी शोधले जातात. प्रसंगी रस्त्यावरील वाहनांना रिक्षा आडवी लावून प्रवाशांची वाट पहिली जाते.

या प्रकारांमध्ये वाहतूक कोंडी वाढत आहे. गर्दीच्या कालावधीत सुद्धा असेच प्रकार सुरु असतात. एका बाजूला मेट्रोचे काम, दुस-या बाजूला रिक्षा स्टॉप, मधल्या बाजूने वाहतूक असल्याने आता नागरिकांना पादचारी मार्गच राहिला नाही. त्यामुळे नागरिकांनी जायचे कुठून हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी चौकात वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. काही वेळेला वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचे प्रकार होतात. पण त्यावर वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येते. रस्त्यावर किंवा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या रिक्षांना जॅमर लावून संबंधित रिक्षा चालकांकडून दंड वसूल केला जात आहे.

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी येथील ग्रेड सेपरेटर मर्ज इन पर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण 150 मीटर लांब व चार मीटर रुंदीचे सिमेंट काँक्रीट करून वाहतूक रस्त्यावरून सुरु केली आहे. या ठिकाणी महामेट्रोतर्फे एक निरीक्षक आणि तीन ट्राफिक मार्शल यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणतेही वाहन या भागात रस्त्यावर थांबू न देण्याबाबत त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.