Talegaon News : फक्त नाट्यगृह बांधून उपयोग नाही, सातत्याने कार्यक्रम होणे गरजेचे –  राजन भिसे

एमपीसी न्यूज – “फक्त नाट्यगृह बांधून उपयोग नाही, सातत्याने कार्यक्रम होणे गरजेचे आहे. कलापिनी मध्ये नाटक आणि त्या संबधी जे उपक्रम घडत आहेत तसे प्रत्येक शहरात होणे गरजेचे आहे. कलापिनीच्या नाट्यसंकुलाबाबत आणि वेगवेगळ्या रंगमंचाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्याची अगदी काटेकोर अंमलबजावणी झाली आहे याचा आज विशेष आनंद होतो आहे. यापुढेही कलापिनीमध्ये प्रशिक्षण, चर्चा या माध्यमातून कायम येत राहीन” असे मत नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले, नेपथ्यकार, वेशभूषाकार, अभिनेते राजन भिसे यांनी व्यक्त केले. कलेद्वारे विकास हे ब्रीद बाळगून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखती मध्ये ते बोलत होते.  

सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या कलापिनी संस्थेचा 45 वा वर्धापन दिन सोहळा शनिवार (दि. 14) रोजी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात, भव्य मंचावर  अतिशय देखणा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण सुद्धा करण्यात आले.

व्यासपीठावर राजन भिसे, सौ.स्मिता भिसे  जे.सी.बी. इंडिया लिमिटेड कंपनीचे एच.आर. व्हाइस प्रेसिडेंट घननीळ केळकर, सौ मेघना केळकर, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, सह सचिव विनायक भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

राजन भिसे पुढे म्हणाले, “नाटकाचा प्रयोग जितका महत्त्वाचा तितकीच नाटकाची प्रोसेस महत्त्वाची आहे. कारण यामधूनच वेगवेगळ्या कल्पना जन्माला येतात. लेखकानं लिहिलेलं स्क्रिप्ट नीट वाचून, त्यावर स्वत:चा विचार करून सादरीकरण केल्यानं त्यामुळे आपल्या सादरीकरणामध्ये अधिक जिवंतपणा येतो.” भिसे यांनी त्यांच्या कारकिर्दीमधले रंजक अनुभव सांगून रसिकांची वाहवा मिळवली. यामध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे, अजूनही बरसात आहे या मालिकांमधल्या भूमिका, वेवेगळ्या नाटकांच्या नेपथ्याचे अनुभव, वेशभूषाकार म्हणून काम करताना कोणत्या दिशेने विचार केला, परदेशात नेपथ्य करताना आलेल्या अडचणी – त्यावर केलेली मात असे वेगवेगळे अनुभव सांगितले.

घननीळ केळकर म्हणाले,” सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक आरोग्या इतकीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कलापिनी सारख्या संस्थामध्ये आल्याने, काम केल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहते.”

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. दिनेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गीताला विनायक लिमये यांनी संगीत दिले होते. अंकुर शुक्ल, विराज सवाई, नेहा तापीकर, अनुजा झेंड यांनी गीत सादर केले. स्वागत विनायक अभ्यंकर यांनी केले. डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी कलापिनी‌ कला गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कोरोनामुळे दोन वर्षे वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षी आयोजित सोहळ्याट उत्साहाचे वातावरण होते. राजन भिसे   यांनी अभिनित केलेल्या  अधांतर या नाटकातील तसेच गंगाधर टिपरे या मालिकेतील  थोडा भाग सादर करून राजन भिसे यांना  संदीप मन्वरे आणि ऋतिक पाटील, हरीश पाटील यांनी मानवंदना दिली.

पुरस्कार पुढीलप्रमाणे –  कै. हेमंत तुंगार युवा गौरव पुरस्कार – चेतन पंडित, सर्वोत्कृष्ट युवती पुरस्कार – सायली रौंधळ, सर्वोत्कृष्ट युवक पुरस्कार – चैतन्य जोशी , चतुरस्त्र कलाकार पुरस्कार – शार्दूल गद्रे, आदित्य धामणकर अष्टपैलू कलाकार पुरस्कार – विराज सवाई,  आश्वासक पदार्पण पुरस्कार – संदीप मन्वरे ,आश्वासक पदार्पण पुरस्कार  – डॉ. सावनी परगी, लक्षवेधी कलाकार पुरस्कार – अनुजा झेंड, लक्षवेधी कलाकार पुरस्कार – खगेश जोशी, पडद्यामागची लक्षणीय कामगिरी पुरस्कार – स्वच्छंद गंदगे,  यशस्वी पदार्पण पुरस्कार – वेदांग महाजन,  धडपड पुरस्कार – अदिती आपटे, हरीश पाटील, बाल भवन सितारा -अनन्या रानडे, आकाश नेने,  कुमार भवन सितारा – श्रीमय कुलकर्णी, कै.पुष्पलता अरोरा स्मृती पुरस्कार – ज्योती ढमाले, हास्य योग सितारा पुरस्कार – दीप्ती आठवले, किसन शिंदे, कै. गोदावरीभाभी व कै.विष्णुभाई शहा स्मृती सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार – श्रीपाद बुरसे आणि अनघा बुरसे, हरहुन्नरी कलाकार पुरस्कार – अनिरुद्ध जोशी, कै.सुनीता घाणेकर कला पुरस्कार – मधुवंती रानडे

राजन भिसे यांची प्रकट मुलाखत डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी घेतली. संस्थेचा अहवाल ध्वनिचित्रफितीद्वारे दाखवण्यात आला. विश्वास देशपांडे यांनी संकलन केले होते. विराज सवाई यांनी निवेदन केले.  माधुरी ढमाले – कुलकर्णी आणि अंजली सहस्त्रबुद्धे यांनी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. विनायक भालेराव यांनी आभार मानले.

विराज सवाई, अनघा बुरसे, अनुजा झेंड, अशोक बकरे, चैतन्य जोशी, धनश्री वैद्य, दीपाली जोशी, आरती पोलावर, दीप्ती आठवले, प्रतिक मेहता, रामचंद्र रानडे,शार्दूल गद्रे, सिद्धी शहा, रवींद्र पांढरे, रश्मी पांढरे  मुक्ता भावसार, अदिती अरगडे, ऋतिक पाटील  आदींनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.