Thergaon: अवैध बांधकामे, रिंग रोड, शास्तीकराच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांच्या सभेत नागरिकांचा गोंधळ

पोलिसांनी नागरिकांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्याकडे रहिवाशांनी ग्रामविकासमंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या रहिवाशांना दुसऱ्या पक्षाने पाठविल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त आज (रविवारी) मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित केली होती. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे उपस्थित होते.

मुंडे यांचे भाषण सुरु असताना सभेतील काही महिलांसह नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्याकडे मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र आमच्या घरांवर हातोडा मारून आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर 100 टक्के रद्द झाला पाहिजे अशी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी मागणी केली. त्यामुळे स्टेजवरील स्थानिक नेते मंडळी अवाक झाले. भांबावून गेले.

गोंधळ सुरू असताना देखील पंकजा मुंडे यांनी भाषण सुरूच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे असा आरोप मुंडे यांनी करताच आम्ही कोणत्या पक्षाचे नसल्याचे नागरिकांनी ठणकावून सांगत आम्हाला कोणी पाठविले नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘शांत रहा..शांत रहा..लोकशाहीत हे घडणे अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत’, असे मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घोषणा देणा-यांना ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.