Thergaon : आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे वाचवले प्राण

एमपीसी न्यूज – घरामध्ये स्वतःला कोंडून घेत अंगावर डिझेल ओतून (Thergaon ) आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीचे प्राण अग्निशमन विभागाने वाचवले.

घटनेची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीच्या अंगावर पाणी मारून दरवाजा उघडत त्यास बाहेर काढले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजता लेन नंबर एक, कैलास नगर, थेरगाव येथे घडली.

राहुल सुरेश किमडे (वय 38, रा. लेन नंबर एक, कैलास नगर, थेरगाव) असे प्राण वाचवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कैलास नगर थेरगाव येथे एका चाळीतील खोलीमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. त्याच्या हातामध्ये माचीस आहे. तो स्वतःला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे यांनी थेरगाव उपअग्निशमन केंद्रात येऊन सांगितली.

त्यानुसार थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी खोलीच्या खिडकीतून राहुल किमडे यांच्या अंगावर पाणी मारले. तसेच दरवाजा ब्रेकरच्या साह्याने तोडून त्यास बाहेर काढून वाकड पोलिसांच्या ताब्यात (Thergaon ) दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.