Talegaon Crime News : भागीदाराने स्वतंत्र व्यवसाय केल्याने मारहाण

एमपीसी न्यूज – भागीदारीमध्ये केबल व्यवसाय करत असताना एका भागीदाराने त्याचा स्वतंत्र केबल व्यवसाय सुरु केला. भागीदाराने केबल व्यवसायाच्या मशिनरी मागितल्याचा कारणावरून तिघांनी मिळून भागीदार व्यावसायिकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता मावळ तालुक्यातील जांबवडे गावात घडली.

अजय टकले (वय 29, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील गोरक्षनाथ गाडे, अमित खंडू गुंजाळ, गणेश गंगाराम बोंबले (रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टकले आणि आरोपी यांच्यात भागीदारीत केबल व्यवसाय होता. मात्र फिर्यादी यांनी स्वतःचा केबल व्यवसाय स्वतंत्रपणे सुरु केला. टकले यांनी आरोपींकडे व्यवसायाच्या मशिनरी मागितल्या. त्या कारणावरून आरोपींनी टकले यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी टकले यांच्या डोक्यात व हातावर दुखापत झाली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.