Hinjawadi : घर मालक आणि भाडेकरू महिलेचे अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घर मालक आणि भाडेकरू महिलेचे तिघांनी अपहरण केले. घर मालकाला मारहाण केली. तर भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजता सुसगाव येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर अपहरण, विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बापू पवार (वय 25, निरवागी, ता. इंदापूर), अमोल गणपत पवार (वय 39, रा. बारामती), अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीला शाळेत सोडून घरी जात होत्या. सुसगाव येथील बिटव्हाईज कंपनी समोर आल्या असता आरोपी एका कारमधून आले. त्यांनी जबरदस्तीने फिर्यादी महिलेला कारमध्ये बसवले. आरोपींनी महिलेशी कारमध्ये गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी महिलेचे अपहरण करण्यापूर्वी त्यांच्या घर मालकाचे देखील अपहरण करून त्यांना कारमध्ये आणले होते. आरोपींनी फिर्यादी यांच्या घर मालकाला मारहाण केली. फिर्यादी महिलेला आरोपी अमोल याच्या बारामती येथील घरी सोडले आणि घर मालकाला कोठेतरी घेऊन गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.