Chikhali : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना चिखली पोलिसांकडून पाच तासात बेड्या

एमपीसी न्यूज – एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या तीन चोरट्यांना चिखली पोलिसांनी केवळ पाच तासात शोधून अटक केली आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली आहे.

विष्णू प्रसाद चौधरी (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. नेपाळ), श्याम बाबूराम राणा (वय 19, रा. मोरेवस्ती चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), राजेंद्रकुमार जोगिराम राणा (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हेत्रे वस्ती चिखली येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. पहाटे दोन वाजताच्या सुमारास एक चोरटा पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएम सेंटरमध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील रोडच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील दर्शनी भागाची तोडफोड केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चिखली पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. चिखली परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. आरोपी विष्णू याला गावाला जाण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांना सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश जवादवाड, उपनिरीक्षक संदीप बागुल, बाबा गर्जे, मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, संभाजी कडलग, कबीर पिंजारी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.