Pune : चित्रांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरीकांनी घडवली आठवणींची सफर

- येत्या १० सप्टेंबर पर्यंत अनुभविता येणार 'वेज् टू रिमेंबर’ या ज्येष्ठ नागरिकांनी चितारलेल्या चित्रांचे प्रदर्शन ; - राजा रवी वर्मी आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : वयं ही स्वप्नांच्या मध्ये येत नाहीत असे म्हणतात, याचीच अनेक उदाहरणे आज व्हीसीडब्लू अकादमी ऑफ फाईन आर्ट्स या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वेज् टू रिमेंबर’ या ज्येष्ठ नागरिकांनी चितारलेल्या चित्रांच्या खास प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पाहायला मिळाली… ‘स्वत:च्या आठवणी आणि कलेमुळे गवसलेले आयुष्यातील प्रेम’ अशी या चित्रप्रदर्शनाची संकल्पना होती, यावर वयाची ८४, ८०, ७० वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या आठवणींना जणू चित्ररुप देत इतरांना आठवणींची सफर घडविली.

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

व्हीसीडब्लू अकादमी ऑफ फाईन आर्ट्स या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने या विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट पुणे (Pune) फाउंडेशनचे सहकार्य प्रदर्शनाला लाभले आहे.

येत्या रविवार दि. १० सप्टेंबर, २०२३ पर्यंत घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत सदर चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने चित्रप्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि छायाचित्रकार गंगाधरन मेनन, डोअरस्टेप शाळेच्या संस्थापिका प्रो. रजनी परांजपे आणि विजया दिलीप चित्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. व्हीसीडब्लू अकादमी ऑफ फाईन आर्ट्सच्या मिनू सडवेलकर यावेळी उपस्थित होत्या.

या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या निशा वर्मा (वय ७१) म्हणाल्या, “माझी नात संस्थेमध्ये चित्रकला शिकत होती. लहानपणापासून आवड असली तरी दैनंदिन व्यापात बाजूला राहिलेली चित्रकलेची कला यानिमित्ताने छंद बनली. गेली ३५ वर्षे रस्त्यांवरील बेवारस प्राण्यांसाठी काम करत असताना केसर नावाचा एका कुत्र्यासोबत जमलेले मैत्र मी माझ्या या चित्रात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.” कला हे आपल्या भावानांचे प्रतिबिंब असल्याने ती व्यक्त करताना मिळणारा आनंद शब्दांत वर्णन करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

माझ्या खिडकीतून दिसणारा बोपदेव घाट मी माझ्या चित्रात रेखाटला आहे असे सांगत ८० वर्षांच्या शकुंतला भालेराव म्हणाल्या, “२०१८-१९ पासून मी संस्थेच्या एबीसीडी अर्थात अॅडल्ट बॅच कॅन ड्रॉ या बॅचला जात आहे. वयं झालं म्हणून आराम करा असे तुम्हाला अनेक जण सांगतील मात्र माणसाने कायम काहीनाकाही करत रहायला हवे.

आवड असण्यासोबतच ते करायची हिंमत उतारवयामध्ये तुमच्यामध्ये असावी लागते हे मात्र खरे. या वयात मला सलग बसून चित्रे काढणे शक्य नव्हते परंतु मी चार तास बसून माझे चित्र पूर्ण केले.” आवड असली की या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता, असे त्या म्हणाल्या.

एबीसीडी बॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅचमधील विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षा वयाने मोठे आहेत. चित्रप्रदर्शनासोबतच या दरम्यान अनेकविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिसंवाद हा ज्येष्ठ नागरिक, शालेय व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, नवोदित कलाकार अशा सर्वांसाठी विनामूल्य खुले असून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ते संपन्न होतील. या प्रदर्शनात व्हीसीडब्लूच्या शिक्षकांची चित्रे देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.