Tokyo Para-Olympics 2020 : भारतीय लष्करातील पॅरा-खेळाडू टोकियो पॅरा ऑलिम्पिक 2020 साठी ठरला पात्र

एमपीसी न्यूज – हवालदार सोमन राणा या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय लष्करातील आंतराष्ट्रीय पॅरा-खेळाडूची निवड बैठे शॉट पुट खेळासाठी F 57 श्रेणीत निवड झाली आहे. लष्करी क्रीडा केंद्र बोर्डाच्या अधिपत्याखालील पुण्यातील खडकी येथील लष्करी पॅरालिंपिक केंद्र बीईजी आणि सेंटर केंद्रातील तो पॅरा-खेळाडू आहे.

राणा हा 38 वर्षिय पॅरा-खेळाडू शिलाँगचा असून सामान्य कुटुंबातील आहे. 1 डिसेंबर 2006 ला त्याच्या युनिट बरोबर कार्यरत असताना सुरूंगाच्या स्फोटात त्याला त्याचा उजवा पाय गमावावा लागला. बहुतांश वेळा पायाला झालेली दुखापत म्हणजे खेळाडूच्या क्रीडा- कारकिर्दीचा अस्त. पण सोमन राणाने भितीवर मात करून स्वतःला प्रोत्साहन दिले व ते ठाम राहिले.

2017 मध्ये त्यांचा लष्कराच्या पॅरालिंपिक केंद्रात प्रवेश झाला. लष्करातील विकलांगत्व आलेल्या खेळाडूंना या केंद्रात पॅरा-खेळातील प्राविण्य मिळवण्यासाठी तयार केले जाते, जेणेकडून त्यांच्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन टिकून राहिल. 2017मध्ये सुरुवात झालेल्या केंद्रातील पॅरा-खेळाडूंनी 28 आंतरराष्ट्रीय तर 60 राष्ट्रीय पदके पटकावली आहेत. आशियाई पॅरा-क्रीडा स्पर्धा, जागतिक लष्करी क्रीडा, जागतिक पॅरा चॅंपियनशीप व जागतिक ग्रँड प्रीक्स यांसारख्या अनेक स्पर्धांमध्येही येथील खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधीत्व करत पदके मिळवली आहेत.

यावर्षी सोमन राणाने सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत जागतिक टुयनिस पॅरा चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक, एकोणीसाव्या राष्ट्रीय पॅराखेळाडू चँपियनशीप मध्ये 2 सुवर्ण व एक रौप्य अशी पदके मिळवली आहेत. सोमन राणाने आपल्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. टोकियो 2020 पॅरालिंपिकमध्ये पदकांच्या प्रबळ दावेदारांपैकी ते एक असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.