Pune : ‘नमन नटवरा’तून कलांचा त्रिवेणी संगम

२५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात आनंद भाटे यांचे बहारदार गायन

एमपीसी न्यूज – सुरेल नाट्यसंगीतावर अप्रतिम पदलालित्याने सादर केलेले नृत्य, त्याच तालावर चित्राच्या कॅनव्हासवर फिरणारा ब्रश आणि त्यातून निर्माण होणारे सुंदर चित्र अशा नृत्य, नाट्य आणि संगीताचा अप्रतिम कलाविष्काराचा त्रिवेणी संगम ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या नमन नटवरा या कार्यक्रमातून झाला.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात आनंद भाटे यांचा ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम झाला. यामध्ये अजरामर नाट्य संगीत, तरुणाईचे नृत्य आणि चित्रांचा अविष्कार अशा तीन कलांचा एकाच रंगमंचावर रसिकांना आनंद घेता आला. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल आदी यावेळी उपस्थित होते.

गायिका धनश्री कुलकर्णी यांनी शाकुंतल नाटकातील ‘कालिदास हे शाकुंतल रचितो’ या पदाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी संगीत स्वयंवर नाटकातील ‘सजन कसा मन चोरी’ या पदातून दोन प्रेमी युगलांचा लडीवाळपणा दाखविला. संगीत मानापमान नाटकातील ‘नाही मी बोलत नाथा’ या पदामधून त्यांनी भामिनी आणि धैर्यधर या प्रियकारांमधील प्रेमळ संवाद अप्रतिमरित्या सादर केले. या गाण्यांवर मयूर वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहजरित्या पदलालित्याने भामिनी आणि धैर्यधर यांच्यामधील प्रसंग अक्षरश जिवंत केले. आनंद भाटे यांनी सादर केलेल्या ‘या नव नयनासव’ या गाण्याने कार्यक्रम वेगळया उंचीवर नेऊन ठेवला.

मंदारमाला नाटकातील ‘साहम हर डमरु बाजे’ हे शिस्तीपर गीत, संगीत कान्हापात्रा नाटकातील ‘पतित तू पावना, जरी सांभाळी वचना’ तसेच ‘जोहार मायबाप जोहार, तुमच्या हाराचा मी महार’ या गाण्यांनी रसिकांना मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली. या गाण्यांच्या चालीवर आश्विनी चोथे-जोशी यांनी अप्रतिम चित्र साकारले.

तृप्ती गुरव (गायन), स्वाती खळदकर, (गायन), ओकार पाटणकर (सिंथेसायझर), भरत कामत, नरेंद्र साठे (तबला), प्रसाद मांडवलकर (पखवाज), विश्वास कळमकर (टाळ) यांनी साथसंगत केली. मयूर वैद्य, अदित्य गरुड, रुपेश मोरे, विरेश शेटकर, प्रथमेश गावडे, मधुरा देशपांडे, रश्मी बागवे, निशाद चव्हाण यांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.