Tuljapur News: तुळजाभवानी मातेचे मंदिर खुले करण्यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या साथीमुळे बंद असलेले महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, या मागणीसाठी उद्या  (मंगळवारी) तुळजापूर शहर भाजपाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. नगरपरिषदचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली.

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या सात माहिन्यापासून श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने अनेक पुजाऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या उपजिविकेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहराचे संपूर्ण अर्थकारण हे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर अवलंबून  आहे.

शहरातील व्यापारी व पुजारी वर्गाला शारदीय नवरात्र महोत्सवात मंदिर भाविकांसाठी खुले होईल, अशी आशा होती. मात्र शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी भाविकाविना होत असल्यामुळे पुजारी व व्यापाऱ्यांना मोठी पंचाईत झाली आहे.

मंदिर तात्काळ उघडण्यात यावे , यासाठी तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे रविवारी बैठक झाली.

या बैठकीत मंगळवारी (13 ऑक्टोबर) श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय झाला असून सदरील लाक्षणिक उपोषणामध्ये सर्व व्यापारी, पुजारी बांधवानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.

हे लाक्षणिक उपोषण आंदोलन हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली होत आहे. सदरील बैठकीस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.