Talegaon Crime News : मारहाण प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मालकाच्या जागेच्या व्यवहारात पडायचे नाही, म्हणत चार जणांनी मिळून एकाला लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेआठ वाजता गहुंजे स्टेडीयमजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आकाश अरुण पुजारी (रा. साईनगर), पार्थिवन परमसिंह उर्फ बन्नू (रा. चेन्नई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकाच्या जागेच्या व्यवहाराला फिर्यादी यांनी बोलायचे नाही, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या गालावर, खांद्यावर, कमरेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींचे दोन अनोळखी साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी मोबाईल खिशातून बाहेर काढला असता आरोपींनी फिर्यादी यांचे दोन्ही मोबाईल फोन हिसकावून घेतले. मोबाईल मधील सीमकार्ड काढून स्वतःकडे ठेवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.