Bhosari : कंपनीने वापरण्यासाठी दिलेल्या दुचाकीचा अपहार; गाडी मागण्यासाठी गेलेल्या मालकाला मारहाण

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या कर्मचा-याला दुचाकी वापरण्यासाठी दिली. कर्मचा-याने कंपनीतील काम सोडल्याने मालकाने वापरण्यासाठी दिलेली दुचाकी परत मागितली. त्यावेळी दुचाकी न देता तिचा अपहार करून दुचाकी मागण्यासाठी आलेल्या मालकाला मारहाण केली. ही घटना धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

सरिता राजेश सिंग (वय 40 रा इंद्रायणीनगर भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवि सिंग, प्रीती सिंग (दोघे रा. भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरिता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रवि सिंग फिर्यादी सरिता यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता. त्यावेळी सरिता यांनी त्यांची दुचाकी (एम एच 14 / ए ई 6318) त्याला वापरण्यासाठी दिली. रवि याने सरिता यांच्याकडील काम सोडले. काम सोडल्यानंतर सरिता यांनी रवीला वापरण्यासाठी दिलेली दुचाकी परत मागितली. त्यासाठी रवि याने नकार दिला. सरिता गाडीची चावी मागण्यासाठी रवी याच्या घरी गेल्या. त्यावेळी रवि आणि त्याची पत्नी प्रिती या दोघांनी मिळून गाडीची चावी न देता सरिता यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात प्रिती सिंग (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सरिता सिंग, सीमा सिंग, सुनीता सिंग, किरण सिंग, स्नेहा सिंग, प्रभात सिंग, अंकुर सिंग (सर्व रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. 23) सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रिती आंघोळ करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सर्व आरोपी त्यांच्या घरात आले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून प्रिती यांना मारहाण केली. तसेच प्रिती यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. या भांडणात प्रिती यांच्या बॅगेतील अडीच लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र गहाळ झाले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.