Wakad: महिलांसमोर अश्लिल कृत्य; रिक्षाचालक गजाआड

एमपीसी न्यूज – मुलांना शाळेत सोडविण्यासाठी थांबलेल्या महिलांना पाहून अश्लिल चाळे करणा-या रिक्षा चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.12)सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथे घडला. 

राजेंद्र ऊर्फ रामदास जालिंदर अडागळे (वय 27, रा. डिलक्‍स टॉकीज जवळ, शास्त्रीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुलांना शाळेत सोडण्यासाठी शुक्रवारी सकाळी काही महिला थेरगाव येथे बसची वाट बघत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी अडागळे हा तिथे रिक्षा घेऊन आला आणि तिथे थांबला. महिलांचे लक्ष वेधून घेत त्याने अश्लिल हावभाव करण्यास सुरुवात केली.  सजग महिलांनी त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. तो फोटो परिसरातील महिलांना दाखविला असता आरोपी अडागळे याने यापूर्वी देखील असे कृत्य केल्याचे महिलांनी सांगितले. त्यानंतर महिलानी वाकड पोलिसात धाव घेत त्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांना त्याचा फोटो दिला.

त्यानंतर वाकड पोलिसांनी तातडीने त्याला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अडागळे याच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात 2015 मध्ये ही अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला होता. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.