Pimple Saudagar News: आमदार जगतापांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; त्या तिघांचा शोध सुरू

एमपीसी न्यूज – चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाजवळ पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले आहेत. ही घटना आज (मंगळवारी, दि. 23) दुपारी घडली. तिघांनी एका दुचाकीवरून येऊन हा प्रकार केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा ली हे कार्यालय आहे. एका दुचाकीवरून तिघेजण मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आले. त्यातील दोघांनी कार्यालयावर दोन पेट्रोल बॉम्ब टाकले. मात्र, एक बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. तर दुसरा रस्त्यावर पडला आहे.

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. शंकर जगताप आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारा स्टाफ यावेळी कार्यालयात हजर होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून बॉम्ब फेकणाऱ्या त्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.