Uruli Devachi Water Problem: पाण्यासाठी उरुळी देवाची ग्रामस्थ करणार आंदोलन -अतुल बहुले 

Uruli Devachi Water Problem: Uruli Devachi villagers will agitate for water: Atul Bahule

एमपीसी न्यूज – अ वर्ग महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. पत्रे लिहली, निवेदने दिली, आक्रोश मांडला, प्रसार माध्यमांनी दखल घेतली, पण महापालिका अजूनही जागी होत नाही. येत्या 12 दिवसांत पाणी मिळाले नाही तर, ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील, असा इशारा माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे.

लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण केले. पण, पाणी काही मिळत नाही. मंतरवाडीत पाणी येते परंतु, उरुळीत पाणी नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी केली आहे.

त्याची  कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही.  उलट अजून टँकर भोवती गर्दी जास्तच वाढत आहे. सध्या टँकरजवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येऊ शकत नाही.

उरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटरची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे .

कचरा डेपो परिसरात नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो, त्याप्रमाणे उरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सध्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे. पुण्यातील वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोनाला थांबवू शकतो. त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे. तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.