Vadgaon Maval : गटविकास अधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर सरपंच दत्तात्रय पडवळ यांचे उपोषण मागे

ग्रामपंचायतीची सभा उधळून लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज- नवलाख उंब्रे (ता.मावळ) ग्रुप ग्रामपंचायतीची सभा ग्रामसभा उधळून लावण्याचा प्रयत्न करून प्रोसेडिंग पुस्तिकेवर खाडाखोड करणा-यांवर तसेच हलगर्जीपणाबद्दल ग्रामसेवकावर कारवाई करावी, या मागणीसाठी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी गुरुवारी (दि 30) पंचायत समिती समोर उपोषण केले. दरम्यान, गटविकास अधिका-यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर पडवळ यांनी उपोषण मागे घेतले.

नवलाख उंब्रे (ता.मावळ) ग्रुप ग्रामपंचायतीची रविवारी (दि.26) सकाळी 11 वा. भैरवनाथ मंदिरात ग्रामसभा आयोजित केली होती. विशेष ग्रामसभेचा कोरम पूर्ण झालेला असताना वाद निर्माण झाल्याने ग्रामसेवकांनी सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी दोघांनी शासकीय कामात अडथळा आणून महिला कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या हातातील शासकीय रजिस्टर हिसकावून घेऊन रजिस्टरमध्ये खाडाखोड केली.

याविषयी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास ग्रामसेवक हे टाळाटाळ करीत असून शासकीय कामात अडथळा निर्माण करणा-या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून तक्रार देणे आवश्यक असताना अधिका-यांनी तक्रार दिली नाही. म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण सुरू केले असल्याचे सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सरपंच पडवळ यांनी उपोषण मागे घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.