Vadgaon Maval : जांभूळ येथील रेल्वे भुयारी मार्गाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील 40 गावांना जोडणा-या जांभूळ रेल्वे भुयारी मार्गाचे (Vadgaon Maval) शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या मार्गामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार निधीतून हा मार्ग तयार झाला आहे. भुयारी मार्गामुळे आंदर मावळमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रिपाईचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, माजी सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक अंकुश देशमुख, माजी सरपंच नितीन कुडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, धनंजय नवघणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गिरीश सातकर, प्रवीण ढोरे, टाकवेच्या सरपंच सुवर्णा असवले, माजी सरपंच भूषण असवले, सागर आगळमे, ऋषीनाथ बो-हाडे, कल्पना काकरे, तृप्ती जांभूळकर, स्नेहल ओव्हाळ, रुपाली गायकवाड, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

कान्हे व जांभूळ रेल्वे गेट असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा येत होता. वेळ वाया जात होता. फाटक बंद असल्यामुळे रुग्णवाहिकांनाही थांबावे लागत होते. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे (Vadgaon Maval) यांनी भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सतत पाठपुरावा केला. रेल्वे विभागाकडून दीड कोटीचा आणि खासदार निधीतून 50 लाख असा दोन कोटी रुपयांचा निधी उभा करुन दिला. जांभूळ रेल्वे गट बंद करुन भुयारी मार्गाचे काम हाती घेतले.

तीन वर्षानंतर मार्गाचे काम पूर्ण झाले. या भुयारी मार्गामुळे आंदर मावळातील टाकवे बुद्रुक वडेश्वकर, माऊ, नागाठली, कुसवली, बोरीवली, डाहुली, खांडी, सावळा, माळेगाव, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, फळणे, कोंडिवडे, काल्हाट, निगडे आदी गावातील नागरिकांना, शेतकरी, दुग्धव्यावसायिक, कामगार, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कान्हे रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडी कमी होईल. कमी वेळेत आणि सुखकर प्रवास होईल. भुयारी मार्गामुळे आंदर मावळमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Chinchwad Bye Election : एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार – राहुल कलाटे

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”आंदर मावळातील 40 गावांना जोडणारा जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग खुला केल्याने नागरिकांची मोठी सोय झाली. हा भुयारी मार्ग 40 गावांना जोडणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपये खर्च केला आहे. याच पद्धतीने तळेगाव दाभाडे, शेलारवाडी, कामशेत याठिकाणी भुयारी मार्ग केले आहेत. रेल्वे फाटक येथे ओव्हर ब्रीजचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचा रेल्वे फाटकावर थांबण्याचा वेळ वाचणार आहे. भुयारी मार्ग, ओव्हर ब्रिज होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.