Vadgaon Maval: नगरपंचायतीच्या वतीने गरजू कुटुंबांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असून सामाजिक बांधिलकी जपत वडगाव मावळ नगरपंचायतीच्या वतीने बुधवारपासून (दि.१५) रोजी ‘अन्नदान हेच खरे श्रेष्ठ दान’ या उपक्रमांतर्गत हातावरचे पोट असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांसाठी दोन वेळच्या जेवणाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. 

 हे अन्नदान 3 मे २०२० पर्यंत सुरु राहणार असून यात दुपारी 12 ते 1 व सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामागे  जैन समाज मंदिर हाॅलमध्ये जेवण दिले जाणार आहे. गरीब गरजू कुटुंबाला दोन वेळा घरपोच जेवणाचा डबा पोहचविण्यात येणार आहे. सकाळी एक हजार व सायंकाळी एक हजार व्यक्तींना अन्नदान करण्यात येणार आहे. या अन्नदान उपक्रमासाठी मदत करण्यासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, उद्योजक अशोक बाफना, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, नगरसेवक-आरोग्य समिती सभापती राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

काही सामाजिक संस्थांनी सुरू केलेले मोफत जेवण नुकतेच बंद झाल्याने गरीब व गरजू कुटुंबांची परवड सुरु झाली होती. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान उपक्रम सुरू झाल्याने गरीब गरजू कुटुंबांनी समाधान व्यक्त केले. यावेळी  दानशूर व्यक्तींनी आपल्या परिसरातील गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याची वेळ आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा. कोरोना युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांनी शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.