Mumbai : लाॅकडाऊनच्या काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करु नये – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धतता याबाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकाकडून चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील तसेच कोणतीही सक्ती न करण्याची सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

लाॅकडाऊनच्या काळात बऱ्याच पालकांनी चालू वर्षाकरिता तसेच आगामी वर्षाकरिता शाळेची फी जमा करण्याचा कालावधी वाढवण्याची विनंती राज्य शासनाकडे केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या हालचाली बंद करण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची आर्थिक चणचण लक्षात घेता शैक्षणिक व्यवस्थापनाने चालू व आगामी वर्षाची शालेय फी भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांना कोणत्याही प्रकारची सक्ती न करण्याचे सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

लाॅकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.