Vadgaon News : वडगावसह कामशेत, कार्ला, वराळे व नवलाख उंब्रे या गावामध्ये आज लाॅकडाऊन व घरोघरी तपासणी,

इतर दहा गावामध्ये शुक्रवार (दि. 25) व शनिवार (दि. 26) रोजी सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंतर्गत घरोघरी सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरासह तालुक्यातील चार मोठया ग्रामपंचायत हद्दीमध्ये आज बुधवार (दि 23), तळेगाव दाभाडे येथे गुरूवार (दि 24) तर इतर दहा ग्रामपंचायत हद्दीमध्ये शुक्रवार (दि 25) व शनिवार (दि 26) एक दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर केला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

यासंदर्भात प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी लाॅकडाऊनचा आदेश दिला असल्याचे तहसीलदार बर्गे यांनी सांगितले. तालुक्यातील कोरोना हाॅटस्पाॅट ठरलेल्या वडगाव, तळेगाव दाभाडे या शहरांमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत घरोघरी तपासणी केली जाणार आहे.

वडगाव शहरामध्ये तसेच कामशेत, कार्ला, वराळे व नवलाख उंब्रे या गावामध्ये आज बुधवार (दि. 23) रोजी ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी बुधवारी एक दिवसाचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथे गुरूवार (दि. 24) रोजी तपासणी होणार आहे.

शुक्रवार (दि. 25) रोजी सोमाटणे, कडधे, कुणे नामा, कान्हे व नायगाव येथे तर शनिवारी (दि. 26) रोजी कुसगाव ब्रु, इंदोरी, सुदुंबरे, टाकवे बुद्रुक, काले या ठिकाणी एक दिवसाचा लाॅकडाऊन करून घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे.

लाॅकडाऊन असलेल्या ठिकाणी सकाळी 6 ते 9 या वेळेत घरपोच दुध वितरण चालू राहिल, मेडिकल, दवाखाने यांना मात्र कुठलेही बंधन नाही. तसेच शहर व गावच्या सीमा, प्रमुख रस्ते सील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.