Amey Khopkar warns about shooting : मनचिसेच्या अमेय खोपकर यांचा चित्रीकरणादरम्यान हलगर्जीपणा न करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या उद्रेकामुळे ठप्प असलेल्या मनोरंजन क्षेत्राला अनलॉकच्या कालखंडात अनेक अटी शर्तींसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली. पण काही दिवसांपूर्वी ‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील 27 कलाकार व क्रू मेंबर्संना कोरोनाची लागण झाली. याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले.

हलगर्जीपणामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे. तसेच मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं इशारा दिला आहे.

‘राज्यातील लॉकडाउनमुळे गेले अनेक महिने मालिका तसंच सिनेमांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद होते. मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रीकरणास सशर्त परवानगी मिळावी, अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकॉलचे पालन करून शूटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती. दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे’.

_MPC_DIR_MPU_II

‘ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायला हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर ‘मनचिसे’ मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल’, असं खोपकरांनी स्पष्ट केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.