Vadgaon News : मंदिरे दर्शनासाठी खुली करा; अन्यथा रस्त्यावर उतरु – बाळा भेगडे

एमपीसीन्यूज – कोरोना महामारीमुळे बंद असलेली धार्मिक मंदिरे तातडीने खुली करावीत तसेच कीर्तन, प्रवचन व अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास परवानगी मिळावी; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्यसरकारला दिला.

राज्यात हॉटेल,बार सुरू व मंदिर बंद या सरकारच्या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने खुली करावीत, या मागणीसाठी मावळ तालुका भाजपा आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या वतीने मावळ पंचायत समिती समोरील चौकात लाक्षणिक उपोषण करून भजन करण्यात आले. यावेळी  तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सुनील महाराज वरघडे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज शिंदे, घोरवाडीश्वर दिंडीचे हभप संतोष महाराज शेलार, दिलीप विधाते, विठ्ठल शेळके, मावळ भाजपचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, संघटन मंत्री किरण राक्षे, जि. प. सदस्य नितीन मराठे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,संतोष कुंभार,तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण,वडगांव शहर अध्यक्ष किरण भिलारे, संदीप पवार, गणेश कल्हटकर त्याचबरोबर मंदिरांवर उपजीविका म्हणून अवलंबून असलेले फुल उत्पादक शेतकरी, पुजारी गुरव,आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

सोपानराव म्हाळसकर म्हणाले, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते. परंतु, आता अनलॉकची प्रकिया सुरू झाली असल्याने सर्व हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, राज्यातील मंदिरे अद्याप खुली केली नाहीत.तसेच प्रवचन, कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह सुरू नसल्याने कीर्तनकार मंडळींना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

आज दारू विक्रीचा व्यवसाय जोरात चालू आहे. दारू दुकानांसमोर सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचंड गर्दी होते. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होत नाही. बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडली आहेत व हॉटेल बियर बारची दुकानेही आता पुर्ण वेळ उघडली आहेत. तसेच एसटी बसलाही आता 44 प्रवासी बसण्याची परवानगी दिलेली आहे. असे असताना मंदिरातीलच देवाने काय केले, असा सवाल म्हाळसकर यांनी उपस्थित केला.

श्रावण महिन्यात ही मंदिरे बंद असल्यामुळे सर्व भाविकांची निराशा झाली होती. त्यामुळे शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा.

सर्व भाविक भक्त सोशल डिस्टंसिंगचे पालन करतील. मास्क लावूनच दर्शन घेतील. कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी भाविक भक्त घेतील. त्यामुळे भाविक भक्तांच्या श्रद्धेला शासनाने तडा जाऊ देऊ नये, असे आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष हभप सुनिल महाराज वरघडे म्हणाले.

दत्तात्रय महाराज शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.