Vadgaon Maval : बेकायदेशीर नळ कनेक्शन दिल्याने वडगावकरांना मिळते कमी पाणी

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या गृह प्रकल्पांना बेकायदेशीररित्या नळ जोडणी देण्यात आली आहे. आयुष पार्क-कातवी, नाईकनवरे-वडगाव (Vadgaon Maval) या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कनेक्शन आहेत.

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या अध्यक्ष पदी सुरेश शेंडे तर सेक्रेटरीपदी भगवान शिंदे

पाणीपुरवठा सभापतींची कोणतीही परवानगी व ठराव न घेता, तसेच पाण्याचे कुठलेही नियोजन न करता परस्पर पाईप लाईन जोडणी केल्याचे उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात उघडकीस आले आहे. यामुळे सध्या वडगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून पाण्यावाचून नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत.

 

सध्या वडगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून पाण्यावाचून नागरिकांचे अतोनात हाल सुरू असताना सुद्धा नगरपंचायत प्रशासन मात्र त्यांच्याकडे  काना डोळा करून बिल्डर व धनिकांच्या बाजूने काम करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

 

मागील काही महिन्यांपासून शहरात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत असताना  यावर तोडगा काढण्याऐवजी वडगावकरांच्या हक्काचे व तोंडचे असणारं पाणी पळवून बिल्डरांच्या घशात ओतण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे.

 

यावर विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी आवाज उठवला असून वडगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या गृह प्रकल्पांना बेकायदेशीररित्या दिलेल्या पाणी लाईनची त्यांनी स्वतःजाऊन काल स्थळ पाहाणी केली असता, आयुष पार्क-कातवी, नाईकनवरे-वडगाव या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा सभापतींची कोणतीही परवानगी व ठराव न घेता तसेच पाण्याचे कुठलेही नियोजन न करता परस्पर पाईप लाईन जोडणी केलेली आढळून आली असून ही अनधिकृत नळ जोडणी कोणी व कोणाच्या सांगण्यावरून केली यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती म्हाळसकर यांनी दिली आहे.

 

मागील काही वर्षांपासून असे पाणी चोरीचे प्रकार काही मंडळींच्या कृपा आशीर्वादाने व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या संगनमताने सर्रासपणे शहरात चालू असून हे प्रकार पाणी पुरवठा सभापती सायली म्हाळसकर यांनी अनेकदा रंगे हात पकडुन प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले होते तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवरती रोख लावण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचा प्रस्ताव ही त्यांच्या वतीने देण्यात आला होता मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.

 

एरवी सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या फाईलीत अडकून ठेवून अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बिल्डर व धनिकांना बेकायदेशीर पाणी देताना याच नियमांची आठवण का झाली नाही हीच विशेष बाब आहे ?

 

तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून वेळेत टॅक्स वसूल करणाऱ्या नगरपंचायत प्रशासन आता या पाणी चोरांकडून  अवैधरीत्या वापरलेल्या पाण्याचा कोणता व कसा टॅक्स वसूल करणार हा ही तितकाच महत्त्वाचा प्रश्न पुढे येत आहे. हा सर्व मनमानी व भोंगळ कारभार पाहता नगरपंचायत प्रशासनाचा या बेकायदेशीर कामांवरती कोणताही धाक किंवा अंकुश उरलेला नाही का ? असा प्रश्न आता वडगावकर नागरिक विचारू लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.