Talegaon : भेगडे शाळेत गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीराम कुबेर, माजी अध्यक्षा राजश्री शहा व लायन्स क्लबचे इतर मान्यवर सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमात तिसरीच्या विद्यार्थ्यांनी एक कविता सादर केली. बालवाडी छोट्या गटातील आर्यन ढेपे व रिद्धेश रोकडे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची वेशभूषा परिधान केली होती. तसेच विद्यार्थी भाषणात इयत्ता पाचवीची वसुंधरा जाधव व इयत्ता तिसरीची अंजली कांबळे यांनी गांधीजींना देशाविषयीची असणारी तळमळ व भूमिका स्पष्ट केली. तसेच शिक्षक मनोगतातही अनिता चौधरी व कोमल कसबे यांनी देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व व त्यातील आपला प्रत्येकाचा असणारा महत्वाचा वाटा लक्षात घेऊन काम करावे, असा संदेश दिला.

स्वच्छता अभियान विषयावर सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर केली. त्यात सुशिक्षित वा निरीक्षित असाल तरीही स्वच्छतेचे महत्त्व हे प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर सातवीचा सिद्देश भिंताडे या विद्यार्थ्याने सोलापूर येथे कालच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्त्व करत तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे त्याचा हस्ते गुणगौरव करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनीही आपल्या मनोगतातून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच श्रीराम कुबेर यांनीही आपल्या मनोगतात आपल्या देशाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी आपण प्रत्येकाने सजग राहायला हवे, यासाठी आपले घर, परिसर व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे यांनीही गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीचे महत्त्व विशद करून आपण आपल्या देशाच्या प्रगत भवितव्यासाठी एक पाऊल पुढे चालावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता अभियानाचे’ महत्त्व जाणून तसे वागले पाहिजे, प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून करावी, आपल्या घरापासून करावी मग परिसर, गाव व यातूनच देशही स्वच्छ राहील, असे मत व्यक्त केले. यानंतर मनोहर नगर परिसरात स्वच्छता फेरी काढण्यात आली.

मतदान जनजागृती व स्वच्छता यावर घोषणा देत विद्यार्थ्यांनी शाळेचा सर्व परिसर स्वच्छ केला. शाळेच्या शिक्षिकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातही मतदान जनजागृती व स्वच्छ भारत अभियान हे विषय देण्यात आले होते. यातही सर्वांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीचे विद्यार्थी श्रावणी भंडलकर व विराज पिंगळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.