Vinay Kumar Choubey : राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पार पाडल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील (Vinay Kumar Choubey) सर्व सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) सन 1995 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या चौबे यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बी टेक, एम टेक पर्यंतचे शिक्षण आयआयटी कानपूर येथून पूर्ण केले. महाराष्ट्र केडर असलेले आयपीएस चौबे यांनी रत्नागिरी, अकोला, सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. मुंबई पश्चिम उपनगर मधील झोन नऊचे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.

चौबे यांना सन 2009 मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी राज्यातील महत्वाच्या ठिकाणी काम केले. सांप्रदायिक हिंसाचार आणि गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत त्यांनी विशेष काम केले. सन 2012 मध्ये त्यांना पोलीस पदक मिळाले. सन 2010 मध्ये पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह देखील त्यांना मिळाले आहे.

‘सायबर सिक्युरिटी अॅंड मोबिलिटी’ हा अभ्यासक्रम त्यांनी सन 2016 मध्ये जॉर्जिया येथील Kennesaw State University मधून पूर्ण केला. सायबर लॉ विषयावर देखील त्यांनी अभ्यास केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी महत्वपूर्ण काम केले. कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या चौबे यांनी पासपोर्ट कार्यालयातील पेपरवरील कामकाज 100 टक्के पेपरलेस केले.

हेग नेदरलॅंड मधील भारतीय दुतावासात चौबे यांनी भारतीय (Vinay Kumar Choubey) संस्कृती केंद्राच्या गांधी केंद्रात संचालक म्हणून काम केले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांनी गुन्ह्याच्या तपासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर प्रतिबंध, एमपीडीए, सायबर क्राईम, ताण तणाव व्यवस्थापन आदी विषयांवर आयपीएस, राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

Pimpri : राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 14 वा पदवीदान समारंभ संपन्न

मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी एनएसईएल, पॅनकार्ड अशा मोठ्या घोटाळ्यांची प्रकरणे हाताळली. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी विनयकुमार चौबे हे मुंबईचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्या काळात उद्भवलेल्या अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी खंबीरपणे तोंड दिले आहे. सीएए, एनआरसी वरून सुरु असलेल्या जनक्षोभाला देखील त्यांनी हाताळले आहे.

त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक म्हणूनही काम केले आहे. सध्या ते पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आजवरच्या त्यांच्या 26 वर्षांच्या सेवेत त्यांनी कायम सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.