Wakad Crime News : अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला शिवीगाळ आणि दगडफेक; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना पाच जणांनी मिळून शिवीगाळ केली. तसेच एका महिलेने पथकाच्या दिशेने दगड भिरकावला.

याबाबत पाच जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडली.

सागर शरद वाघमारे, त्याच्या दोन बहिणी आणि अन्य दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश सुदेशकुमार कांबळे (वय 29) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात काम करतात. ते त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांसोबत दत्तमंदिर रोड, वाकड येथे शरद वाघमारे यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली.

एका महिलेने कारवाई करणाऱ्या पथकाच्या दिशेने दगड भिरकावला. याबाबत पाच जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.