Wakad : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातली लोखंडी पहार; दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने व्यापाऱ्याच्या डोक्यात लोखंडी पहार घातली. तर त्याच्या आईला बेदम मारहाण केली. दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) मध्यरात्री एकच्या सुमारास म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे घडली.

मुकेश देवराम चौधरी (वय 33), जमनीबाई देवराम चौधरी (वय 58, दोघे रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) अशी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मायलेकांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश देवराम चौधरी (वय 37) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर घडसिंग (रा. म्हातोबानगर, वाकड) याच्यासह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे वाकड रोड येथे ‘माताजी कलेक्शन’ नावाने कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या दुकानावर अचानक हल्ला चढवला. आरोपी दुकानाच्या दरवाजाची जोरजोरात जाळी वाजवू लागल्याने मुकेश आणि त्यांची आई जमनीबाई दोघे बाहेर आले. आरोपींनी ‘सद्गुरू कॉलनी येथील ओमसाई गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची वर्गणी का देत नाही’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी सागर याने त्याच्या हातातील लोखंडी पहार मुकेश यांच्या डोक्यात मारली. तसेच, अन्य आरोपींनी जमनीबाई यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुकेश रक्तभंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. यामध्ये मुकेश यांच्या डोक्याला आणि जमनीबाई यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वाकड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची धरपकड सुरु केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.