Pimpri: भाजप सुसाट, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेत सामसूम

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी भाजपने जाहिरातबाजी करुन जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. एक प्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुकले आहे. तर, विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महापालिकेत विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेत सामसूम असून विरोधक गलितगात्र झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी सत्ताधा-यांसमोर ‘सपशेल’ शरणागती पत्कारल्यासारखी अवस्था झाली आहे.

पिंपरीत शिवसेना, चिंचवडमध्ये भाजप आणि भोसरीत भाजप सहयोगी आमदार आहेत. भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याची शहरभर जाहिरातबाजी केली आहे. शहरात सर्वत्र फलक लावले आहेत. या माध्यमातून भाजपने एकप्रकारे विधानसभेचे रणशिंगच फुंकले आहे. विरोधक मात्र सुस्त आहेत.

महापालिकेतील सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हताश आणि निराश झाले आहेत. पक्षात मरगळ आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला. पवार कुटुंबियातील सदस्याचा तब्बल दोन लाख मताच्या फरकाने पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे शहरातील नेते थंड झाले आहेत.

सत्ताधा-यांवर हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडे मोठा दारुगोळा आहे. मागील पाच वर्षात शहरातील एकही अनधिकृत बांधकाम नियमित झाले नाही. शास्तीकर सरसकट माफ झाला नाही. साडेबारा ट्कके परताव्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचीच सत्ता असताना पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प एक इंचदेखील पुढे सरकला नाही. आंद्रा-भामा आसखेडचे भिजत घोंगडे कायम आहे. शहरवासियांना पावसाळ्यातच पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. पोलीस आयुक्तालय झाले. पण, गुन्हेगारी कमी झाली नाही. उलट गुन्हेगारीत वाढच झाली.

शहरात सर्वत्र खड्डेच-खड्डे पडले आहेत. सत्ताधा-यांनी कच-याच्या निविदेत मोठा घोळ घातला, अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधा-यांना घेरण्याची संधी विरोधकांकडे चालून आलेली आहे. परंतु, विरोधक यावर ‘चकार’ शब्द काढत नाहीत. सत्ताधा-यांना सोडून विरोधक महापालिका प्रशासनाला टार्गेट करत आहेत. खानावळीचे हस्यास्पद आंदोलन करत आहेत. कारभा-यांच्याविरोधात थेट नाव घेऊन आरोप करण्याची धमक देखील विरोधकांमध्ये नाही. कारण, विरोधकांचे महापालिकेतील विविध विषयात हात गुंतले आहेत.

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना विरोधकांनी सत्ताधा-यांसमोर ‘सपशेल’ शरणागती पत्करल्यासारखी अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते आसूड ओडत असताना विरोधकांचे टार्गेट मात्र महापालिका प्रशासन आहे. सत्ताधा-यांसोबत छुपी युती करण्यात विरोधक दंग आहेत. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेवर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या वाघाचे झाले म्याव-म्याव

महापालिकेत विरोधी बाकावर असलेली शिवसेना देखील सत्ताधा-यांच्या विरोधात काहीच बोलत नाही. शिवसेनेने दोनवेळा महापालिकेतील सत्तेत सहभागी करुन घेण्याची केलेली विनंती भाजपने अशरक्षा धुडकावून लावली. भाजपने दोनवेळा ठेंगा देऊन देखील शिवसेना शांत आहे. महापालिकेत आपण विरोध आहोत, याचे भानही शिवसेनेच्या नगरसेवकांना राहिले नाही. शिवसेना सत्ताधा-यांच्या विरोधात ब्र देखील काढत नाही. शिवसेनेच्या वाघाचे म्याव-म्याव झाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनसे अस्तित्वहीन

मनसेचे शहराध्यक्ष एकमेव नगरसेवक आहेत. स्मार्ट सिटीच्या कंपनीवर देखील ते संचालक आहेत. परंतु, ते कधीच सत्ताधा-यांच्या विरोधात आक्रमकपणे आणि परखडपणे बोलत नाहीत. त्यामुळे मनसे अस्तित्वहीन झाली आहे.

काँग्रेस उरली राष्ट्रीय मुद्द्यापुरती

काँग्रेस महापालिकेतून संपली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी महापालिकेतील चुकीच्या कारभाराबाबत चकार शब्द काढत नाहीत. कधीतरी प्रसिध्दीपत्रक काढून लुटुपटूचा विरोध दाखविला जातो. शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सोडून काँग्रेस पदाधिकारी राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलण्यात धन्यता मानतात. त्यामुळे काँग्रेसला शहरातील प्रश्नांचे काही देणे घेणे आहे की नाय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.