Wakad : बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री केल्याबाबत तिघांवर गुन्हा

कॉलेजमधील मित्राने बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घातक औषधांची खरेदी

एमपीसी न्यूज – कॉलेजमधील मित्र काही दिवस मेडिकल दुकानदार मित्राकडे मेडिकलसाठी औषध खरेदी-विक्री करीत होता. मेडिकलसाठी औषधांची खरेदी करता करता मेडिकलच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने घातक औषधांची खरेदी करून त्याचा साठा केला. तसेच डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषधांची विक्री देखील केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीराम बालाजी रुपनर (रा. थेरगाव, मूळ रा. लातूर) असे आत केलेल्या एकाचे नाव आहे. त्याच्यासह गोविंद मनोहर पांचगे (रा. थेरगाव, मूळ रा. कर्नाटक) आणि सोपान माळी (रा. भुसावळ, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभाग पुणे परिमंडळ तीनच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव (वय 42) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 19 ऑक्टोबर 2019 ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला. अन्न व औषध विभागाने सदाशिव पेठ येथील कैलाश इंटरप्रायझेस या घाऊक औषध दुकानाची Mephentermine Sulphate Injection IP या औषधांच्या खरेदी विक्रीबाबत तपासणी केली. या तपासणीमध्ये या औषधाच्या दहा मिलीच्या दोन हजार बाटल्यांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार फिर्यादी यादव यांनी पुनावळे मेडिकल पुनावळे, थेरगाव या मेडिकल दुकानात तपासणी केली. त्यावेळी पुनावळे मेडिकलकडून संबंधित औषधाची खरेदी केली नसल्याचे समोर आले.

कैलाश इंटरप्रायझेस या घाऊक औषध विक्री करणा-या दुकानात पुनावळे मेडिकलच्या नावाने विक्री परवान्याची शिक्का मारलेली प्रत दिल्याचे दिसले. त्यानुसार कैलाश इंटरप्रायझेस या दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पुनावळे मेडिकलचे भागीदार शरद गीते व विजय शिंदे यांना दाखवण्यात आले. त्यावेळी त्यांचा मित्र आरोपी श्रीराम रुपनर याने त्याच्या गोविंदा पांचगे याच्यासह मिळून पुनावळे मेडिकलच्या नावाने संबंधित औषधांची खरेदी केली असल्याचे निदर्शनास आले.

त्याचबरोबर शिवाजीनगर येथील आरती फार्मा या घाऊक औषध विक्री करणा-या दुकानात देखील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरील औषधांची खरेदी केल्याचे आढळले. आरोपी श्रीराम रुपनर हा पुनावळे मेडिकलमध्ये मागील काही दिवसांपूर्वी औषध खरेदी विक्रीचे काम करत होता. तो दुकानाचे भागीदार शरद गीते यांचा कॉलेजमधील मित्र होता. अन्न व औषध प्रशासनाने आरोपी रुपनर याच्याकडे चौकशी केली असता त्याने औषधे खरेदी करून त्याचा थेरगाव येथे साठा केल्याचे मान्य केले. तसेच त्याने काही औषधे भुसावळ येथील आरोपी सोपान माळी याला विकल्याचेही सांगितले. प्रशासनाने Mephentermine Sulphate Injection IP या औषधाच्या 290 बाटल्या जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी तिघांवर भादंवि भारतीय दंड विधान कलम 467,468,175,276,336,34 तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 चे कलम 18(c), 18A, 22(1)(cca), 18(a)(vi), 27(b)(ii), 27(d), 28 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रुपनर याला अटक केली असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Mephentermine Sulphate Injection IP हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास त्याचा औषध खाणा-याच्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतो. यामुळे मतिभ्रम, बेशुद्ध होणे, हृदयाची गती कमी होऊ शकते. औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.